मोहोळ : गावची वीज का घालवतो असा जाब विचारत लाकडी दांडक्याने मारहाण करीत महावितरणच्या शेटफळ येथील यंत्र चालकाला जखमी केले.
याप्रकरणी पोलिसांनी बावी (ता. माढा) येथील तानाजी उर्फ मुन्ना भालचंद्र मोरे व त्याच्या इतर दोन साथीदारांवर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नित्यानंद सुभाष पाटील (रा.आष्टी, ता. मोहोळ) हे शेटफळ येथील महावितरण कार्यालयात यंत्रचालक म्हणून कार्यरत आहेत. १६ जुलै रोजी रात्री १२.१५ वाजण्याच्या दरम्यान बावी गावातील तानाजी भालचंद्र मोरे हे त्यांच्या इतर अनोळखी साथीदारांसोबत कार (एम.एच.४५/ ए.डी००७७) या चारचाकी गाडीतून आले. पाटील शेटफळ उपकेंद्रात काम करत बावी गावची लाइट मुद्दाम बंद करतो म्हणत शिवीगाळ सुरू केली. त्यावेळी पाटील यांनी शिवीगाळ करू नका, सध्या पावसाळा सुरू आहे, गावची लाइट ही रात्री साडेनऊ ते पावणे बारा वाजेपर्यंत बंद पडली होती, असे सांगितले. इतक्यात त्यांनी गाडीतून तीन लाकडी दांडके आणून तू लय माजला आहे म्हणत मारहाण केली. कार्यालयामध्ये पाटील हे रात्रपाळी ड्युटीसाठी एकटेच होते.
याबाबत नित्यानंद पाटील यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, मुन्ना मोरे व इतर अनोळखी दोन व्यक्तींवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहायक पोलीस फौजदार बाबासाहेब भातुगडे करीत आहेत.