भीमानगर : रमेश पाटील या शेतकऱ्याने कृषिपंपाची लाखो रुपयांची थकबाकी भरून ६३ टक्के सवलत मिळविली आणि थकबाकीत ६३ टक्के माफी मिळविली. विशेषत: शेतकऱ्याने केलेल्या प्रयत्नाची दखल घेत महावितरणने या ग्राहकाचा सत्कार केला.
रमेश विजय पाटील (भीमानगर, ता. माढा), असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.
सध्या सर्वत्र थकबाकीपोटी सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे. रमेश पाटील यांची एकूण थकबाकी ही दोन लाख ६८ हजार २४० रुपये होती. त्यांनी महावितरणच्या कृषिपंप वीज धोरण २०२० योजनेअंतर्गत भाग घेतला आणि एक लाख रुपये रक्कम भरून एकूण वीज बिलापोटी ६३ टक्के माफी मिळविली. त्यांच्या या प्रयत्नांची दखल घेत महावितरण टेंभुर्णीचे उपकार्यकारी अभियंता यू. जी. जाधव व लेखापाल सतीश देवकर यांनी त्यांचा सत्कार केला.
शासनाच्या सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन आढेगाव शाखा अभियंता एस. आर. पाटील यांनी केले आहे. सप्टेंबर २०२० पर्यंत विलंब आकार शंभर टक्के माफ करण्यात आला आहे, तसेच २०१५ पूर्वीपर्यंत थकबाकीवरील व्याज पूर्णत: माफ करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी महावितरण उपविभाग टेंभुर्णी उपकार्यकारी अभियंता यू. जी. जाधव, सहायक लेखापाल सतीश देवकर यांचे पथक प्रयत्न करीत आहे.
---
१९ रमेश पाटील
थकबाकी भरणारे शेतकरी रमेश पाटील यांचा सत्कार करताना उपकार्यकारी अभियंता यू. जी. जाधव, सतीश देवकर.