सोलापूर : अवघ्या जगाला व्यापून टाकणारा कोरोना विषाणू म्हणजेच कोविड-१९ या संसर्गजन्य आजाराची लढाई आता निर्णायक टप्प्यात आली आहे. प्रत्येक घरातून, प्रत्येक देशात ही लढाई सुरू आहे. या लढाईचे नेतृत्व वैद्यकीय क्षेत्राकडे असले तरी त्यांना पूरक सेवा देणारे अनेक क्षेत्र अत्यावश्यक सेवेसाठी अहोरात्र कार्यरत आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे वीज क्षेत्र. आपले कर्तव्य चोखपणे बजावत कोरोनाविरोधात झुंज देणारे कोविड योद्धा असोत किंवा लॉकडाऊनमुळे घरीच राहणारे नागरिक किंवा घरूनच काम करणारे (वर्क फ्रॉम होम) सर्व क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी यांना सध्या गरज आहे ती अखंडित वीजपुरवठ्याची. ही सेवा देण्यासाठी महावितरणचे सुमारे ४० हजार अभियंते, तांत्रिक कर्मचारी अहोरात्र कार्यरत असल्याची माहिती महावितरणच्या प्रशासनाने दिली.
कोरोनाविरुद्धच्या लढाईत वैद्यकीय, पोलीस, महसूल, आरोग्य आदी अनेक शासकीय विभाग झुंज देत आहेत. शासनाचाच एक भाग असलेले महावितरणचे अभियंते व कर्मचारी देखील वीजपुरवठा सुरळीत ठेवून या विभागांना ऊर्जा देत आहेत. खरे पाहिले तर वीज हे क्षेत्र इतर अत्यावश्यक सेवेतील सर्वच क्षेत्रांसाठी अत्यंत अत्यावश्यक आहे. कोणत्याही भागातील वीजपुरवठा खंडित झाल्यास तो त्वरित दुरुस्त करण्यासाठी महावितरण अंतर्गत असलेल्या शाखा कार्यालयामार्फत विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. कोणत्याही परिस्थितीत जास्त काळासाठी वीज बंद न ठेवता तो पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आदेश महावितरणला वरिष्ठ पातळीवरून प्राप्त झाले असल्याचेही सांगण्यात आले.
वीजपुरवठा खंडितचे प्रकार वाढले...- एप्रिल-मे मधील वादळ, गारपीट आणि मुसळधार पावसामुळे झाडे, झाडांच्या फांद्या वीजयंत्रणेवर कोसळून वीजयंत्रणा जमीनदोस्त होत आहे. वीजयंत्रणेवर पावसाचे पाणी पडले की वीजवाहिन्या नादुरुस्त होतात व वीजपुरवठा खंडित होतो. एवढेच नव्हे तर उपकेंद्रातील पॉवर ट्रान्स्फॉर्मर नादुरुस्त होणे, पेट घेण्याचे प्रमाण वाढत आहे. साधारणत: मार्चमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरु झाला आहे. उन्हामुळे तापलेल्या वीजयंत्रणेवर पावसाचे दोन-तीन टपोरे थेंब पडल्यावर पीन किंवा पोस्ट इन्सूलेटर फुटून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढत असल्याचे महावितरणच्या अधिकाºयाने सांगितले.
वीज खांब कोसळण्याचे प्रमाण वाढले...कोरोना विषाणूने महावितरणच्या अभियंता व कर्मचाºयांंची परीक्षाच सुरू आहे. गेल्या दीड महिन्यात राज्यामध्ये सर्वदूर भागात अवकाळी पाऊस, वादळी वाºयामुळे राज्यात हजारो वीजखांब वीजवाहिन्यांसह कोसळले आहेत. लॉकडाऊनमुळे मर्यादित मनुष्यबळ उपलब्ध असताना अक्षरश: रात्रंदिवस काम करीत महावितरणच्या अभियंता व कर्मचाºयांनी वीजयंत्रणेची मोठी हानी झाली असताना विक्रमी वेळेत वीजपुरवठा सुरळीत करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.