आप्पासाहेब पाटील
सोलापूर : मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातील भिगवण ते वाशिंबे या रेल्वेस्थानक भागातील दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम ६०० मजुरांनी रात्रंदिवस काम करून पूर्ण केले. त्यामुळे या मार्गावरून १२० किलोमीटर प्रति तास वेगाने आता रेल्वे एक्स्प्रेस गाड्या धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, वाशिंबे ते भिगवण या दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम २५ जुलै २०२२ पासून सुरू अन् ९ ऑगस्ट २०२२ रोजी पूर्ण झाले. या विभागाचे विद्युतीकरणही एकाचवेळी पूर्ण झाले. हे काम पूर्ण करण्यासाठी ६०० मजुरांनी ऐन पावसात रात्रंदिवस काम केले. यात रेल्वे कर्मचारी आणि अधिकारी यांचा मोलाचा वाटा आहे. दुहेरीकरण व विद्युतीकरण काम पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने टी २८ मशीन, पॉइंट्स आणि क्रॉसिंग मशीन, टॅम्पिग मशीन, ४ हायड्रा, ४ हिटाची, ४ जेसीबी इत्यादी प्रमुख मशीनचा समावेश होता.
------------
रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून पाहणी
रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी ९ ऑगस्ट २०२२ रोजी वाशिंबे-भिगवण या दुहेरीकरणाच्या कामाची पाहणी केली. यावेळी विभागीय व्यवस्थापक शैलेश गुप्ता, मनोज शर्मा, रजनीश माथूर, दिनेश कटारिया, चंद्रभूषण, आनंद स्वरूप आणि सोलापूर विभागातील इतर शाखा अधिकारी इत्यादी उपस्थित होते.
--------
या कामामुळे सोलापूर विभागातील सर्वच गाड्यांचा वेग वाढणार आहे. दुहेरीकरण पूर्ण झाल्याने या विभागाची लाईन क्षमता वाढण्यास मदत होईल. गाड्यांचा वेग वाढेल आणि अधिक संख्येने प्रवासी गाड्या धावण्यासही मदत होईल.
- प्रदीप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक, सोलापूर मंडल
--------
मुंबई -चेन्नई मार्ग सुपरफास्ट...
भिगवण- वाशिंबे सेक्शन आज एनआय उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करून कार्यान्वित करण्यात आला. भिगवण ते वाशिंबे दरम्यानच्या उर्वरित विभागाचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मुंबई ते चेन्नई हा संपूर्ण मार्ग दुहेरी मार्गाचा झाला आहे. त्यामुळे मुंबई-चेन्नई हा मार्ग सुपरफास्ट झाला आहे.
--------
चार स्थानके अन् १० पूल...
भिगवण ते वाशिंबे हा भाग २८.४८ किमीचा असून त्यात भिगवण, जिंती रोड, पारेवाडी आणि वाशिंबे या स्थानकाचा समावेश आहे. उजनी धरणातील ४१ छोटे पूल आणि ३ मोठे पूल समाविष्ट असल्याने हा सेक्शन महत्त्वाचा होता. या विभागात ९ छोट्या व एका मोठ्या पुलांचा समावेश आहे.