लोकमत न्यूज नेटवर्क
बार्शी : बार्शी शहरातील पोस्ट चौकाजवळील घराच्या जागेचा नगरपालिकेने सर्वसाधारण सभेत केलेला चुकीचा व बेकायदेशीर ३७ चा प्रस्ताव रद्द करून शासनाकडे पाठवावा या मागणीसाठी विविध संघटनांच्या वतीने आंदोलन केेले. याची दखल घेत नगरपालिका प्रशासनाने नऊ जणांची एक समिती तयार करून त्यांची १ सप्टेंबर रोजी बैठक आयोजित केली आहे.
यासाठी प्रहार संघटना, स्वराज इंडिया, इंक्रेडिबल समाजसेवा ग्रुप आणि मानवी हक्क संरक्षण व जागृती या संघटनांनी बार्शी नगर परिषदेसमोर सत्याग्रह आंदोलन केले होते. या समितीत समन्वयक दीनानाथ काटकर, मनीष देशपांडे, संजीवनी बारंगुळे, विनोद नवगण, ॲड. सुहास कांबळे, दिनेश पवार, रवी घोलप, प्रमिला झोंबाडे व उमेश नेवाळे यांचा समावेश केला आहे.
नगरपालिकेने या जागेमध्ये चुकीचा ठराव मंजूर केल्याने तो रद्द करण्यासाठी आंदोलन केले. तेथील नागरिकांना तिथेच घर द्यावे, अशा मागण्या मांडत, गरिबांचे घर उद्ध्वस्त करून मानवी हक्कांचे उल्लंघन करण्याचा प्रकार असल्याने व संविधानामधील ७३ वी घटनादुरुस्ती व १२ वी अनुसूचीनुसार कुठलाही प्रस्ताव किंवा ठराव मंजूर करण्यापूर्वी जनतेला विश्वासात घेतले नाही, आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होते.
आंदोलन स्थळी मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांनी येऊन नऊ जणांची समिती करून त्यांच्याशी प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याप्रमाणे घर वाचवा : घर बनवा यासाठी ही समिती तयार केली.