सोलापूर- महापालिकेने नमामि चंद्रभागे आणि नमामि गंगेच्या धर्तीवर ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज मंदिराच्या परिसरातील तलावाची स्वच्छता आणि परिसराच्या सुशाेभीकरणाचे काम हाती घेतले आहे. शहरातील सामाजिक संघटनांनी यात सहभाग नाेंदवावा, असे आवाहन उपायुक्त धनराज पांडे यांनी बुधवारी केले.
ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात स्मार्ट सिटी याेजनेतून कामे सुरू आहेत. याठिकाणी वाॅकिंग ट्रॅकसह सुशाेभीकरणाची कामे सुरू आहेत. मात्र, अद्यापही या भागात तळीरामांचा वावर असताे. परिसरात अस्वच्छता असते. याबद्दलच्या तक्रारी आल्यानंतर उपायुक्त पांडे आणि विभागीय अधिकारी तपन डंके, पंच कमिटीचे सिद्राम काेनापुरे यांनी परिसराची पाहणी केली. दुपारच्या सुमाराला झिंगत बसलेल्या तळीरामांना हुसकावून लावले. पालिका कर्मचाऱ्यांकडून गणपती घाटाची स्वच्छता केली. किल्ल्याच्या बाजूला पडलेला आजाेरा हटवून घेतला. यावेळी पांडे म्हणाले, निर्मात्याने वसुंधरेची निर्मिती करताना प्रत्येक ठिकाणी भरभरून नैसर्गिक सौंदर्य दिले आहे. या नैसर्गिक सौंदर्याचे जतन करणे हे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे. म्हणूनच तर केंद्र सरकारने गंगा नदीच्या शुद्धतेवर आणि परिसर स्वच्छतेवर अधिक भर दिला आहे. ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांनी तलावाची निर्मिती केली. मंदिर परिसर हा स्वच्छ, सुंदर आणि प्रसन्न असला पाहिजे; पण त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. यापुढील काळात पालिकेचे कर्मचारी नियमितपणे स्वच्छता माेहीम राबवतील. पंच कमिटीच्या सदस्यांनी पालिकेच्या उपक्रमाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
सिद्धेश्वर मंदिर परिसरात नागरिकांची अस्वच्छता करू नये. तलावात कपडे, घाण, निर्माल्य टाकू नये. निर्माल्य ठेवण्यासाठी व्यवस्था केली असून, त्याठिकाणीच निर्माल्य टाकावे. किल्ल्याच्या बाजूकडील रस्त्याचे सुशाेभीकरण हाेत आहे; परंतु याठिकाणी तळीरामांचा अड्डा असताे. या परिसराचे पावित्र्य ओळखून नागरिकांनी या भागात गैरप्रकार हाेणार नाही, याची काळजी घ्यावी. याठिकाणी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये सामाजिक संघटनांनी सहभागी व्हावे.
-धनराज पांडे, उपायुक्त, मनपा