साेलापूर : महापालिकेने गुरुवारपासून ढाेल-ताशाच्या निनादात मालमत्ता कर वसुली माेहीम सुरू केली. एमआयडीसी परिसरातील एक कारखाना सील करण्यात आला. एकाच दिवशी ११ लाख ८१ हजार रुपयांचा कर वसूल करण्यात आला.
काेराेना महामारीमुळे महापालिकेचे उत्पन्न घटले आहे. चालू वर्षात मिळकतदारांनी कर भरण्यास प्रतिसाद दिलेला नाही. मागील थकबाकी आणि चालू वर्षातील आकारणी असा एकूण ४४८ काेटी रुपयांचे कर संकलन मार्चअखेर अपेक्षित हाेते. परंतु, ११ मार्चपर्यंत केवळ ७१ काेटी रुपयांची वसुली झाल्याचे कर संकलन विभागाचे म्हणणे आहे. डिसेंबर महिन्यात पालिकेने बड्या थकबाकीदारांच्या मालमत्ता सील केल्या. त्यानंतर कारवाई थांबली. आता मार्चअखेर ढाेल-ताशे घेउन कारवाईला सुरुवात झाली.
पालिकेच्या कर संकलन विभागाचे प्रमुख प्रदीप थडसरे, हद्दवाढ विभाग प्रमुख रउफ बागवान यांच्या उपस्थितीत कर्मचाऱ्यांनी हाेटगी राेडवरील ५८ पेठ, ६० पेठ या भागात जाउन ढाेल ताशाच्या निनादात कारवाई सुरू केली. सायंकाळी रविवार पेठ, अक्कलकाेट राेड परिसरातील बड्या थकबाकीदारांच्या घरासमाेर ढाेल-ताशे वाजविण्यात आले. काही थकबाकीदारांनी वसुलीला प्रतिसाद दिल्याचे थडसरे यांनी सांगितले.
कारखानदाराला यापूर्वी दिली हाेती नाेटीस
अक्कलकाेट राेड एमआयडीसीमधील अशाेक काेरमकाेंडा यांच्या कारखान्याकडे सहा लाख रुपयांचा मिळकतकर थकीत आहे. काेरमकाेंडा यांना यापूर्वीही नाेटीस बजावली आली हाेती. त्यांनी प्रतिसाद न दिल्याने गुरुवारी कारखान्याला सील ठाेकण्यात आल्याचे थडसरे यांनी सांगितले. या भागातील दाेन नळ कनेक्शन ताेडण्यात आले.
खुल्या जागांचे माहिती संकलन
खुल्या जागांवरील कर माेठ्या प्रमाणावर थकीत आहे. बड्या थकबाकीदारांची यादी संकलित करण्यात आली. यातील चार ते पाच जागांचा लिलाव करणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव आयुक्तांकडे सादर हाेणार असल्याचे कर संकलन अधिकाऱ्यांनी सांगितले.
फ्रीज, घरातील साहित्यही जप्त करु
महापालिकेच्या उत्पन्नाचा एकमेव स्राेत मालमत्ता कर आहे. अनेक लाेकांनी अनधिकृत जाेडण्या घेतल्या. शहरात विकासाची कामे करायची असतील, नगरसेवकांना भांडवली निधी हवा असेल तर थकीत कर वसूल हाेणे अपेक्षित आहे. पालिकेने नाेव्हेंबरपासून अभय याेजना जाहीर केली आहे. त्यालाही काही नागरिक प्रतिसाद देत नाही. आता कारवाई थांबणार नाही. तुम्ही थकीत कर भरणार नसाल तर तुमच्या घरातील फ्रिज, टिव्ही, चैनीच्या वस्तू जप्त हाेउ शकतात.
- जमीर लेंगरेकर, उपायुक्त, मनपा.
---
शहरातील मिळकतींची संख्या - २ लाख २१ हजार ६०१
अपेक्षित कर - ४४८ काेटी १८ लाख
थकबाकी - ३७७ काेटी ३२ लाख