साेलापूर : काेराेनामुळे आगामी वर्षात हाेणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करणार आहे. मुंबई महापालिकेसाठी एकसदस्यीय तर पुणे, पिंपरी-चिंचवड, साेलापूरसह इतर पालिकांमध्ये द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुका हाेतील, असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहर आणि जिल्ह्यातील नेत्यांना पुण्यात दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात जिल्ह्यातील माेजक्या नेत्यांशी संवाद साधला. साेलापूर विधान परिषद, महापालिका व झेडपी निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाची काय भूमिका हवी, यावर विचारविनिमय केला. शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संताेष पवार, महेश काेठे, मनाेहर सपाटे, दिलीप काेल्हे, जनार्दन कारमपुरी, किसन जाधव, महेश गादेकर, विद्या लाेलगे यांच्याकडून शहरातील कामांचा आढावा घेतला. जाधव आणि पवार यांनी संघटन वाढीसाठी केलेल्या कामांचा आढावा सादर केला. शहराच्या विविध भागात पक्षाने नवे लाेक जाेडल्याचे पवार यांनी सांगितले.
काेल्हे व कारमपुरी यांनी शहराध्यक्ष महत्त्वाच्या बैठकांना बाेलावत नसल्याची तक्रार केली. प्रदेशाध्यक्षांनी सुकाणू समितीची स्थापना केली. या समितीची बैठक हाेत नसल्याचे सांगितले. यापुढील बैठकांना या सर्वांना बाेलावत चला. एकमेकांमधील मतभेद बाजूला ठेऊन काम करा, असे अजित पवार यांनी सांगितले. साेलापुरात तुम्हाला एकसदस्यीय वाॅर्ड रचना हवी की द्विसदस्यीय, असे पवारांनी विचारले. त्यावर द्विसदस्यीय असे शहरातील नेत्यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुंबईमध्ये एक सदस्यीय वाॅर्ड रचना हवी आहे. आम्ही पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये द्विसदस्यीय करताेय. साेलापुरातही द्विसदस्यीय करूया. काेराेनामुळे काम करायला अनेकांना वेळ मिळाला नाही. आगामी जिल्हा परिषद व महापालिका निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे तुम्हाला पक्ष संघटन वाढीसाठी मिळेल, असे पवार आणि जयंत पाटील यांनी सांगितले.
प्रलंबित पक्षप्रवेश लवकर व्हावेत
ग्रामीण विभागाच्या बैठकीला पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय शिंदे, आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, माजी आमदार दीपक साळुंखे, कल्याणराव काळे, भगिरथ भालके, निरंजन भूमकर, लतीफ तांबाेळी आणि जिल्हा निरीक्षक सुरेश पालवे उपस्थित हाेते. काेराेना कमी झाल्यामुळे आता पक्ष संघटन वाढीवर जाेर द्या, असे पवारांनी सांगितले. जिल्ह्यातील पक्षाची घडी विस्कळीत आहेे. ती सावरण्यासाठी अजित पवार यांनी महिन्यातून एकदा बार्शी, पंढरपूर व साेलापूरमध्ये येऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधावा. काही लाेक पक्षात येण्यास तयार आहेत. त्यांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम करावा, अशी मागणी राजन पाटील यांनी केली.
प्रशासनावर वचक नाही, एक समन्वयक नेमा
ग्रामीणच्या नेत्यांनी पालकमंत्र्यांबद्दल अवाक्षर काढले नाही. मात्र, प्रशासकीय अधिकारी आमचे ऐकत नाहीत. प्रशासनावर आपला वचक नाही. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची कामे, पक्ष संघटन यासाठी एक समन्वयक नेमण्यात यावा. अजित पवारांनी विशेष घालावे, अशी मागणी केली. झेडपीमध्ये निधी वाटपात अनियमितता आहे. मनमानी सुरू आहे. यावरही नियंत्रण हवे, असेही काही नेत्यांनी सांगितले.