पंढरपूर : शहरातील विस्थापित नगर परिसरात १५०हून अधिक लोकांनी अतिक्रमण केले आहे. अतिक्रमित पत्र्याचे शेड पाडण्यास नगर परिषद प्रशासनाने बुधवारपासून सुरुवत केली आहे.
जुना कराड नाका येथील रस्त्याच्या कामासाठी झोपडपट्टी काढण्यात आली होती. तेथील कुटुंबांना व जुना दगडी पुलाजवळील नवीन पूल बांधताना बाधित झालेल्या कुटुंबांना विस्थापितनगर परिसरात जागा देण्यात आली आहे.
पंढरपुरात जागेच्या किमती मुंबई, पुणेप्रमाणे आहेत. विस्थापितनगर हे शहरातील मध्यभागी आहे. शिवाय जवळ यमाई-तुकाई तलाव आहे. यामुळे याठिकाणी गोरगरीब लोकांनी अतिक्रमण केले आहेच. त्याचबरोबर अनेक छोट्या-मोठ्या नेत्यांनीही त्याठिकाणी पत्र्याचे शेड उभारून अतिक्रमण केले आहे. त्या परिसरात असणाऱ्या १०० हून अधिक घरांना वीज, पिण्याच्या पाण्याची सोय आहे.
त्या परिसरात आणखीन नव्याने अतिक्रमण होत असल्याचे पाहून नगर परिषद प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. बुधवारी त्या परिसरातील काही लोकांचे शेड जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आले. त्याचबरोबर अतिक्रमणात असलेल्या घरांचे वीज कनेक्शनही तोडण्यात आले आहे. अतिक्रमण केलेल्या नागरिकांनी त्यांचे अतिक्रमण काढून घ्यावे. अन्यथा नगर परिषदेने अतिक्रमण काढल्यानंतर त्यांचे नुकसान होईल, असा इशारा अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांना परिषदेच्या वतीने देण्यात आला आहे.
आम्ही जायचं कुठं? घरासाठी व्याजानं काढलेत पैसे
व्याजाने पैसे घेऊन घर बांधले आहे. अचानक आमचे घर काढल्यास आम्ही कुठं जायचं. आम्हाला येथून काढल्यास दुसरीकडे जागा द्यावी. अन्यथा काहीकाळ आमचे अतिक्रमण काढू नका. अन्यथा आम्ही जेसीबीसमोर झोपणार असल्याचे अतिक्रमण काढलेल्या लोकांनी नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांगितले.
फोटो :::::::::::::::::::::::::::::::
विस्थापितनगर येथील अतिक्रमण केलेले पत्र्याचे शेड करताना नगरपालिकेचे प्रशासन. (छाया : सचिन कांबळे)