अकलूज : माढा लोकसभा मतदारसंघातील करमाळा, कुर्डूवाडी, सांगोला, म्हसवड आणि फ लटण या पाच नगरपरिषदांच्या विकासकामांच्या संदर्भातील प्रस्ताव दि. २५ जूनपर्यंत सादर करावेत. त्यावर निर्णय घेतला जाईल, अशा सूचना नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी दिल्या असल्याची माहिती खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी दिली. खा. मोहिते-पाटील यांच्या पुढाकाराने या नगरपालिकांच्या विकासासंदर्भात आज मुंबई येथे बैठक झाली. करमाळा, कुर्डूवाडी, सांगोला, म्हसवड आणि फ लटण या पाच नगरपरिषदांमधील सर्व अडचणी आगामी काळात सोडविण्यासाठी खा. विजयसिंह मोहिते-पाटील प्रयत्नशील आहेत. त्यासाठी त्यांनी या पाच नगरपरिषदांचे नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, संबंधित तालुक्यातील आमदार आणि नगरपरिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांच्याबरोबर बैठक आयोजित केली होती. मुंबई येथील साखर संघाच्या कार्यालयात आज (मंगळवारी) सायंकाळी पाच वाजता ही बैठक झाली. या बैठकीसाठी खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे, सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख, आ. प्रभाकर घाडगे, आ. दीपक साळुंखे-पाटील आदी उपस्थित होते. या पाचही नगरपरिषदांच्या हद्दीतील सार्वजनिक सुविधा, रस्ते, गटारी, सार्वजनिक शौचालये, दिवाबत्ती आदी विकासकामांसाठी निधीची मागणी सर्व नगरसेवकांनी लावून धरली. तसेच नगरपरिषदांना मिळणारे अनुदान सुलभरित्या मिळावे व अधिक विकासासाठी विशेष अनुदान मिळावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. नगरपरिषदांच्या हद्दीतील वाढती लोकसंख्या पाहता त्यांना मिळणाऱ्या विकास निधीत वाढ झाली पाहिजे असा आग्रह खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी धरला. त्यावेळी नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम व साताऱ्याचे जिल्हाधिकारी रामास्वामी यांनी दि. २५ जूनपर्यंत या पाचही नगरपरिषदांच्या विकासकामांचे सर्व प्रस्ताव आपल्यासमोर हजर करावेत, त्यांच्या विकास निधीसाठी सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असा शब्द दिला असल्याचे खा. मोहिते-पाटील यांनी सांगितले. त्यामुळे या नगरपरिषदांमध्ये विकासकामाला गती येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. २५ जून रोजी सायं. ५ वाजता या संदर्भात पुन्हा बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. --------------------------करमाळा, कुर्डूवाडी, सांगोला आणि सातारा जिल्ह्यातील फ लटण व म्हसवड या नगरपरिषदांना वाढीव विकास निधी मिळवून देण्यासाठी आपण आज ही बैठक आयोजित केली होती. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून २५ जून रोजी संबंधित नगरपरिषदांचे प्रस्ताव आल्यानंतर ते मंजूर करून घेऊन येथील विकासकामे पूर्ण करण्यासंदर्भात आपण पाठपुरावा करणार आहोत.- विजयसिंह मोहिते-पाटील,खासदार, माढा
नगरपरिषदांचा होणार विकास
By admin | Published: June 11, 2014 12:19 AM