राकेश कदम, साेलापूर: महापालिकेच्या मिळकतकर संकलन विभागाचे सर्व्हर गेल्या दाेन दिवसांपासून बंद पडले आहे. कर संकलन निरीक्षकांनी राेख रकमेऐवजी धनादेश स्वीकारण्याचे काम सुरू केल्याचे कर संकलन विभाग प्रमुख युवराज गाडेकर यांनी गुरुवारी सांगितले.
गाडेकर म्हणाले, तांत्रिक अडचणींमुळे कर संकलन विभागाचे सर्व्हर बंद आहे. कर संकलन विभागाने मार्च महिन्यात जप्तीची कारवाई सुरू केली आहे. एक लाखाहून अधिकची थकबाकी असलेल्या थकबाकीदारांना नाेटिसा बजावल्या आहेत. या थकबाकीदारांकडून गुरुवारी केवळ धनादेश स्वीकारण्यात आले. शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस पालिकेचे प्रशासकीय कामकाज बंद असेल. कर संकलन केंद्रही बंद असेल. ऑनलाइन कर भरण्याची सुविधा साेमवारनंतरच सुरू हाेईल, असेही गाडेकर यांनी सांगितले. महापालिकेने मार्च महिन्यात किमान १०० काेटी रुपयांचे कर वसुलीचे उदिष्ट निश्चित केले आहे. सुमारे २० काेटी रुपयांची वसुली झाली आहे. सर्व्हरची अडचण आली असली तरी महिनाअखेर कर वसुलीचे उदिष्ट पूर्ण हाेईल, असेही गाडेकर यांनी सांगितले.