सोलापूर : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या व थुंकणाऱ्या २३१ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांना ६७ हजार १५० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
राज्य सरकारने सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुपारी, पान, पानमसाला, गुटखा तसेच अन्य तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यास, थुंकण्यास व धूम्रपानास प्रतिबंध करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना दंडासह शिक्षा ठोठावण्यात येत आहे.
विडी आणि सिगारेट ओढण्याचे धोके मोठ्या प्रमाणात आहेत. फुप्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका असतो. त्यातच ब्रेन हॅमरेजसारखा धोकाही आहे. लठ्ठपणाही येऊ शकतो. तर तंबाखू, गुटखा यामुळेही कर्करोगाचा धोका आहे. शिवाय या दोन्हींतही हृदयरोगाचा धोका आहे.
सिगारेट ओढणाऱ्यांपेक्षा त्याचा धूर नाकावाटे जाणाऱ्या समोरच्या व्यक्तीला या धुराचा अधिक धोका असतो. त्यामुळेच सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने कायदा २००३ नुसार सार्वजनिक ठिकाणी अशा पदार्थांचे सेवन करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
अठरा वर्षांखालील मुलांना गुटखा, सिगारेट आदी तंबाखूजन्य उत्पादने विकण्यावरही प्रतिबंध घालण्यात आला आहे. कोरोनामुळे या नियमांचे पालन अधिक तत्परतेने करण्याकडे प्रशासनाचे लक्ष आहे.
महापालिकेच्या झोन क्रमांक ६ अंतर्गत डिसेंबर २०२० मध्ये सर्वाधिक ७६ जणांवर कारवाई करण्यात आली. तर झोन क्रमांक १ मध्ये फक्त तिघांवर कारवाई झाली. २६ मे ते २७ ऑक्टोबर दरम्यान मास्क न वापरणाऱ्या व थुंकणाऱ्या २३ हजार ९४३ जणांवर कारवाई करण्यात आली. यातून ३० लाख ५५ हजार ३१० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
--------
धूम्रपान करणारेच दंडापासून अनभिज्ञ
धूम्रपान करणाऱ्यांवर २०० रुपये दंड आकारला जातो. याची जनजागृतीच मोठ्या प्रमाणात झाली नाही. धूम्रपान करणाऱ्या अनेकांना महापालिकेकडून आकारल्या जाणाऱ्या दंडाविषयी माहिती नाही. शहरात अनेक महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी व शासकीय कार्यालयांच्या परिसरात अनेक नागरिक हे धूम्रपान करताना व थुंकताना दिसून येतात.
^^^^^^^^
नागरिकांनी घ्यावी काळजी
फक्त कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळेच नव्हे, तर स्वत:च्या आरोग्याची काळजी म्हणून नागरिकांनी व्यसनांपासून दूर राहावे. महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार शहरात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांवर व थुंकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी कायद्याचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन सफाई विभागातर्फे करण्यात आले आहे.
----------
विडी-सिगारेट ओढण्याचे धोके
धूम्रपानामुळे फुप्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका अधिक आहे. धूम्रपान हे स्वत:बरोबरच इतरांसाठीही धोकादायक ठरू शकते. सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग असून, त्यात धूम्रपान करणाऱ्यांना याचा धोका अधिक आहे. त्यामुळे व्यसनापासून दूर राहणे गरजेचे आहे.
॰॰॰॰॰॰॰॰