बार्शी : तांदळाचा होलसेल व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्याने वसूल केलेली रक्कम आणि तांदळाचे कट्टे मुनीमनेच चोरून नेऊन मालकाला तीन लाखांची टोपी घातल्याचा प्रकार पुढे आला आहे.
९ एप्रिल ते २० सप्टेंबरदरम्यान ही घटना घडली. याबाबत मनीष प्रफुल्ल शहा यांनी बार्शी शहर पोलिसांत फिर्याद दिली असून, सचिन तुकाराम राऊत (रा. आदर्शनगर, नागणे प्लॉट, बार्शी) या मुनीमविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पाेलीस सूत्रांकडील मिळालेल्या माहितीनुसार, मनीष शहा यांचा तांदूळ विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचे होलसेल दुकान असून, ते काही व्यापाऱ्यांना माल पोहोचविण्याचा व्यवसाय करतात. तांदळाची ऑर्डर घेणे, माल पोहोच करणे व त्याची वसुली करण्याचे काम सचिनकडे विश्वासाने आणि जबाबदारीने सोपविले होते; परंतु वसूल केलेल्या पैशाचा तो गेली काही दिवस वापर स्वतःसाठी करत होता. त्यांनी १८ व्यापाऱ्यांना तांदूळ दिल्यानंतर त्यांच्याकडून वसूल केलेले २ लाख ८४ हजार ८४७ रुपये स्वत:साठी वापरले. त्याबरोबरच गुदामातील २५ हजार रुपयांचे तांदळाचे कट्टे दुकान मालकाच्या परस्पर उचलून विश्वासघात केल्याची फिर्याद दिली आहे. अधिक तपास पाेलीस नाईक सचिन कदम करत आहेत.