त्यानुसार कुर्डुवाडी पोलिसांत रणजित धनाजी पांडगळे (वय २०), रोहित धनाजी पांडगळे (वय १९) व धनाजी संभाजी पांडगळे (वय ४५, सर्व रा.शिराळ) यांच्यावर खून केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत प्रियंका सागर सरवदे (वय ३०,रा. शिराळ) यांनी फिर्याद दिली. ही घटना १७ नोव्हेंबर २०२० रोजी शिराळ गावात घडली. त्यात सागर सरवदे याचा खुनात मृत्यू झाला. केवळ कुर्डुवाडी पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल होण्यास विलंब झाल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी प्रियांका सागर सरवदे या शिराळ गावात पोलीस पाटील म्हणून काम करतात. त्यांना या खुनातील आरोपी रणजित पांडगळे हा वारंवार मानसिक त्रास देत होता. नोव्हेंबर महिन्यात दिवाळीसाठी फिर्यादी फलटण येथे माहेरी गेली होती. यावेळी तिचा पती सागर सरवदे यांचा १७ नोव्हेंबर रोजी फोन आला व त्यांनी फोनवरून तिघांनी भांडण काढून एका हत्याराने मारहाण केली.
घटनेच्या दुसऱ्या दिवशी १८ नोव्हेंबर रोजी गावच्या सरपंचानी फोन करून फिर्यादीला पतीचे निधन झाल्याचे सांगितले. त्यानंतर पतीचा खून झाल्याचे समोर आले. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे करीत आहेत.
---
अखेर तिघांविरुद्ध गुन्हा नोंदला
फिर्यादीत प्रियंका सरवदे यांनी म्हटले म्हटले आहे की, कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात गेले, मात्र येथील पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदवून घेण्यास नकार दिला. २४ नोव्हेंबर रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी व ३० नोव्हेंबर रोजी पोलीस अधीक्षक ग्रामीण यांच्याकडेही गुन्हा दाखल करण्याबाबत दाद मागितली, तरीही कोणी दखल घेतली नाही. अखेर ॲड. हरिश्चंद्र कांबळे यांच्याद्वारे माढा न्यायालयात मुख्य न्याय दंडाधिकारी एस. एस. सय्यद यांच्याकडे न्याय मागितला. त्यावरून न्यायालयाने कुर्डुवाडी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यावरून संबंधित तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आरोपींना अद्याप अटक केलेली नाही.