बार्शी : उजनी धरणावर मासे पकडण्यासाठी जावयाचे सांगून पाच वर्षांपूर्वी इंद्रकुमार गायकवाड (वय १२) या अल्पवयीन मुलाचा निर्घृण खून केल्याप्रकरणी विश्वास जनार्धन साळुंखे (रा. भारनिमगाव, ता. इंदापूर) याला दोषी धरत बार्शी जिल्हा सत्र न्यायधीश ए. बी. भस्मे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २३ मार्च २०१७ रोजी हे खून प्रकरण घडले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी विश्वास साळुंखे हा पीर साहेबांच्या भाटनिमगाव (ता. इंदापूर) येथे जत्रेला आला होता. त्याने १२ वर्षीय इंद्रकुमार गायकवाड व दुसरा आर्यन गायकवाड यालाही उजनी धरणावर मासे पकडण्यासाठी मोटारसायकलवरून नेले. आरोपी विश्वासने आर्यन गायकवाड यास एका रसवंती दुकानाजवळ सोडून इंद्रकुमार यास सोबत घेऊन माढा तालुक्यात शिराळ गावच्या शेतात नेले. तेेथे त्याचा निर्घृण खून करून तो तेथून निघून गेला.
इंद्रकुमारचा भाऊ रावसाहेब गायकवाड यांनी २४ मार्च २०१७ रोजी टेंभुर्णी पोलिसांत तक्रार दिली होती. सहायक पोलीस निरीक्षक बल्लाळ यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात १२ साक्षीदार तपासण्यात आले. तपास अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन, तेथे आरोपीचे पाकीट जप्त करून त्यातील त्याचे ओळखपत्र व ड्रायव्हिंग लायसेन्स व चप्पलही हस्तगत केली. या वस्तू न्यायालयात सादर केल्या.
न्यायालयासमोर सादर केलेले पुरावे, उच्च न्यायालयाचे व सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे आणि सरकारच्या वतीने व आरोपीच्या वतीने केलेल्या युक्तिवादाचा विचार करून न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.
विविध कलमांतर्गत ठोठावलेल्या शिक्षा एकाच वेळी भोगावयाच्या असून सरकारी वकील प्रदीपसिंह रजपूत, सहायक सरकारी वकील प्रदीप बोचरे यांनी, तर मूळ फिर्यादीच्या वतीने ॲड. दिनेश देशमुख यांनी काम पाहिले. डी.वाय.एस.पी. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी आणि कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून अमृत खेडकर यांनी काम पाहिले.
----
इतर कलमांतर्गत शिक्षा
या प्रकरणात भादंवि ३०२ कलमाखाली जन्मठेप व दोन हजारांचा दंड ठोटावला. दंड न भरल्यास दोन महिन्यांची साधी कैद सुनावली. कलम ३६३ नुसार सात वर्षे कारावास व हजार रुपये दंड आणि तो न भरल्यास हजार रुपये दंड ठोटावला. दंड न दिल्यास महिन्याची साधी कैद, भादंवि ३६४ खाली १० वर्षांची शिक्षा व १ हजार दंड न दिल्यास १ महिन्याची कैद अशी शिक्षा सुनावली.