अक्कलकोट : बांधाच्या कारणावरून होणाऱ्या सततच्या वादविवादाला पूर्णविराम देण्यासाठी दिराने भावजयीला संपवण्याचा कट रचला. हा कट पूर्वनियोजित होता आणि तिच्यावर सर्वांगावर कोयत्याने वार केले. अखेर हा कोयताच गोत्यात आणणारा ठरल्याची कबुली आरोपीने पाेलीस कोठडीत दिली आहे.
शेतीच्या बांधाचे वादविवादातून काझीकणबस येथे संगीता देशट्टी या विवाहितेचा दीर शांतप्पा देशट्टी याने काेयत्याने वार करून खून केल्याचे उघड झाले आहे. त्याला ७ सप्टेंबर रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायदंडाधिकाऱ्याने १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर त्यास पुन्हा न्यायालयात हजर केले असता १३ सप्टेंबरपर्यंत कोठडीत वाढ केली. कोठडीतील या तपासकामात त्याने खुनाचा कट पूर्वनियोजित असल्याची कबुली देत घटनाक्रम वदला.
काझीकणबस येथे देशट्टी कुटुंबात चार सख्खे भाऊ असून त्यांची एकूण आठ एकर शेतजमीन आहे. काही वर्षांपूर्वी सारेच स्वतंत्र झाले होते. प्रत्येकाच्या वाट्याला दोन एकर जमीन आली. चौघेही अधिक उत्पन्न घेण्यासाठी प्रयत्न करीत होते. दरम्यान संगीता देशट्टी आणि आरोपी शांतप्पा देशट्टी या भावजय-दीर यांच्यात बांधावरून वाद उद्भवला. नातेवाइकांतील ज्येष्ठ मंडळी आणि ग्रामस्थांनी अनेक वेळा त्यांची समजूत घालून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. हा वाद सुटण्याऐवजी बांधाचा वाद वाढत गेला.
मागील महिन्यात झालेल्या भांडणात आरोपी शांतप्पा याने संगीताला तुला लवकरच बघून घेतो, कायमस्वरूपी काटा काढतो अशी धमकी दिली होती. मात्र त्याच्या इशाऱ्याकडे संगीताने दुर्लक्ष केले.
रविवारी नेहमीप्रमाणे संगीता सकाळी शेताकडे निघाल्या होत्या. दरम्यान, आरोपीने सकाळपासून कट रचून तलावाजवळ दबा धरून बसला. सायंकाळी त्या शेतातून घरी परतत असताना दबा धरून बसलेला शांतप्पा हातामध्ये कोयता घेऊन समोर आला. त्याने धारदार कोयत्याने हल्ला चढवला. त्यात त्या खाली कोसळल्या. संगीताच्या शरीरावर आरोपी याो क्रूरपणे डझनभर वार करून गतप्राण केले. त्यानंतर पुरावा नष्ट करायच्या उद्देशाने प्रेत जवळील तलावातील पाण्यात टाकून दिले.
---
आईच्या आठवणीने मुलाचे पाय शेताकडे वळाले
दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी संगीता यांचा मुलगा व घरातील लोकांनी आई घरी का परतली नाही? या चिंतेने मुलासह नातेवाईक यांच्या मनात काहूर माजला. तिला शोधण्यासाठी त्यांचे पाय शेताकडे वळाले. वाटेत त्या तलावात मृतदेह तरंगत असल्याचे निदर्शनास आले. नातेवाइकांना याची माहिती दिली असता सरपंच सिध्दाराम धर्मसाले, उपसरपंच दत्तात्रय मुनाळे, पोलीस पाटील दीपक मंठाळे यांनी पोलिसांना पाचारण केले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड व सहायक पोलीस निरीक्षक महेश भावीकट्टी दाखल झाले. दरम्यान पंचनामा झाला.
---
अन् खुनाचा संशय बळावला...
तलावातून मृतदेह काढताना संगीताचा खून झाल्याचे कोणाच्याही लक्षात आले नव्हते. मृतदेह बाहेर काढल्यानंतर अंगावरील जखमा पाहता खुनाचा संशय बळावला. मयत संगीता यांचे पती हे स्वभावाने भोळे आहेत. त्यामुळे शेती व कौटुंबिक वादविवाद्यात ते कधी पडत नव्हते. मात्र संगीता सांसारिक असल्याने तिच्याकडे घरचा कारभार होता. तिला संपवले की आपला प्रश्न कायम सुटेल असे शांतप्पाला वाटत होते.
---
फोटो: ११ संगीता देशट्टी
११ शांतप्पा देशट्टी