ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ३ - 'कण रगडिता वाळूचे तेलही गळे' असा वाक्प्रचार आपल्याकडे परिचित आहे. याला साजेसे कार्य सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात एका जिगरबाज डॉक्टरने करून दाखवले आहे. अपुरी साधनसामग्री.. अनंत अडचणी पण हरायचे नाही. ही खूणगाठ बांधून त्यांनी अडगळीत पडलेल्या जुन्यापुराण्या इमारतीचे सोने करीत तब्बल ४0 वर्षात जे जमले नाही ते अवघ्या सहा महिन्यांत या डॉक्टरने 'मानव-प्राण्यांच्या अवयवांचे म्युझियम' साकारले आहे.
सोलापूर मराठवाडा, कर्नाटकाच्या सीमेवर असल्याने नेहमीच छत्रपती शिवाजी महाराज सवरेपचार रुग्णालयावर तशी रुग्णांची मोठय़ा प्रमाणात वर्दळ असते. येथील डॉक्टरांकडून नेहमीच नवनवीन उपक्रम राबवले जातात. प्रतिकूल स्थितीत येथील न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सतीन मेश्राम यांनी आपल्या तीन सहयोगी डॉक्टरांच्या मदतीने उपलब्ध साधनसामग्रीमध्ये अभिनव असे मानवी आणि प्राण्यांच्या अवयवांची इत्थंभूत दर्शन घडवणारे संग्रहालय (म्युझियम) साकारले आहे.
ऑगस्ट २0१५ मध्ये नागपूरहून सोलापूरच्या डॉ. वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयात न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी काहीतरी वेगळे करण्याची खूणगाठ बांधली. अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनीही त्यांना सकारात्मकता दाखवली आणि त्यांचे विचारचक्र सुरू झाले. मेश्राम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर रुग्णालयात त्यांच्या विभागाचे काम फक्त शवविच्छेदन कक्ष एवढेच र्मयादित होते. ते विस्तारित करण्याचा चंग बांधला. रुग्णालयाच्या सी ब्लॉकची इमारत गेल्या कित्येक वर्षांपासून धूळखात पडून होती. अधिष्ठाता पोवार यांच्या परवानगीने ती ताब्यात घेतली. या इमारतीची पुरती वाताहत झाली होती. दारे, खिडक्या गायब झालेले. कचर्याचे मोठे ढीग साचले होते. मायक्रोबायॉलॉजी सोशल मेडिसिन आणि फार्मालॉजी या विभागाच्या सहकार्याने सर्वप्रथम स्वच्छता मोहीम राबवली. दारे, खिडक्या, विद्युत साहित्यासाठी वर्गणी करुन डागडुजी केली आणि म्युझियमसाठी तयारी सुरू केली.
नव्याने काहीतरी करण्यासाठी आर्थिक तरतूद नव्हती, पण डॉ. मेश्रामांनी हार मानली नाही. सहकारी डॉ. संतोष भोई, डॉ. सुशीम वाघमारे, डॉ. रिजवान कामले, अन्य चतुर्थश्रेणी कर्मचार्यांनी वेळेचे भान न ठेवता प्रसंगी हाती पडेल ती कामे केली. रुग्णालयाने जुन्या टाकून दिलेल्या पार्टीशनचा वापर करून त्यावर इन्स्ट्रुमेंट डिस्प्ले तयार केले. याचा मेडिकलच्या विद्यार्थ्यांना अद्ययनासाठी वापर होणार होता. वापरात नसलेल्या काचेच्या जारमध्ये छोटी अर्भके, मानवी मेंदू, हृदय, प्राण्यांमध्ये सापांच्या विविध प्रजाती, अजगर, विविध प्रकारच्या अपघातातील दृष्ये, हल्ल्यामध्ये वापरली गेलेली हत्यारे असा असंख्य संग्रह आकर्षकपणे या म्युझियममध्ये मांडण्यात आला आहे. गेल्या ४0 वर्षात कोणाला सुचले नाही हे काम अवघ्या सहा महिन्यात मूर्त स्वरूपात आले आहे.
अजूनही हे कार्य विकसित करण्याचे काम सुरू आहे. विविध हाडांच्या परीक्षणासाठी ऑस्थॉलॉजी विभाग, विषारी द्रव ओळखण्यासाठी टॉक्सीकॉलॉजी विभाग, फोटोग्रॉफी, रेडिओलॉजी आणि हिस्टोपॅथॉलॉजी कार्यान्वित करण्याचे काम चालू आहे. या उपक्रमाचे कौतुक करताना संजय गोरे, दिव्यकांत गांधी यांच्यासह काही मंडळींनी मदतीचा हात पुढे केला आहे. असाच ओघ आला तर अद्ययावत यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी डॉ. मेश्राम आणि त्यांचे सहकारी उत्सुक आहेत. नव्याने साकारलेल्या या मुझियमचा उपयोग केवळ एम. बी. बी. एस., एम. डी. डॉक्टरांपुरता र्मयादित न राहता इयत्ता १0 वी, १२ वी. च्या विद्यार्थ्यांमध्ये वैद्यकीय विज्ञानाबद्दल गोडी निर्माण व्हावी यासाठी होणार आहे.