सोलापूर : दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री घराबाहेर पडलेल्या मुलीने सोलापूररेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म १वरील प्रवाशांसाठी असलेले वातानुकूलित (एसी)चे प्रतीक्षालय फोडले. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी आई-वडिलांचा जबाब घेतला. त्या जबाबात आई-वडिलांनी आमची मुलगी मनोरूग्ण नसल्याबाबतचे लेखी लिहून दिले आहे.
याबाबत लोहमार्ग पोलीस ठाणे, सोलापूर येथे राजनंदिनी तानाजी साठे (वय १९, रा. दमानी नगर, सोलापूर) हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत लोहमार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोलापूर रेल्वे स्थानकावर शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास प्लॅटफॉर्म १वरील वातानुकूलित प्रतीक्षालयात राजनंदिनी साठे हिने प्रवेश केला. त्यानंतर तिने रागाच्या भरात प्रतीक्षालयातील काचा, खिडक्या, खुर्च्यांची मोडतोड करून ७५ हजार रुपयांचे नुकसान केले. याप्रकरणी जमीर महिबूब खान (वेटिंग रूम कर्मचारी) याने लोहमार्ग पोलिसांत फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय गोरे हे करीत आहेत.
----------
----------
राजनंदिनी १२वी पास...
राजनंदिनी साठे ही सोलापुरातील एका महाविद्यालयात शिकत आहे. तिने नुकतीच १२वीची परीक्षा देऊन त्यात चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाली आहे. ती पुढील शिक्षणासाठीही प्रयत्न करीत होती, असे तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले. तिची आई घरकाम करते तर तिचे वडील एका ठिकाणी नोकरी करतात.
------------
७५ हजारांचे नुकसान
या घटनेत सोलापूर रेल्वे स्थानकावरील वातानुकूलित प्रतीक्षालयातील खिडक्यांच्या काचा, खुर्च्या व इतर साहित्यांची मोडतोड केली. या घटनेत रेल्वेचे ७५ हजारांचे नुकसान झाले. विनापरवाना रेल्वे स्थानक व प्रतीक्षालयात प्रवेश व रेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.