Barshi Vidhan Sabha ( Marathi News ) : बार्शी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे पराभूत उमेदवार माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी निवडणूक निकालानंतर मुंबईत जाऊन माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी, 'काळजी करू नका राजाभाऊ, आम्ही कायम तुमच्या पाठीशी आहोत", असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी राजेंद्र राऊत यांचा सत्कार केला. बार्शीच्या निकालानंतर फडणवीस यांनी कॉल करून मुंबईत बोलावल्याचे राऊत यांनी सांगितले.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत दिलीप सोपल यांनी बार्शी मतदारसंघात राजेंद्र राऊत यांचा ६४७२ मतांनी पराभव केला. त्यानंतरही फडणवीस यांनी राऊत यांना सोबत असल्याची ग्वाही दिली.
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर आमच्यातील गटबाजींमुळे झाला : राऊत
माझा पराभव विरोधकांकडून झालेला नाही. आमच्यातील एकमेकांचे पाय ओढणे याचा फटका बसला. आम्ही सुधारणा करू. केंदात मोदी सरकार आहे. राज्यात आमचे सरकार आलेले आहे. बार्शीतील सुरू असलेली विकास कामे अशीच सुरु राहतील, अशी भूमिका राजेंद्र राऊत यांनी मांडली, निवडणुकीतील पराभवानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
राऊत पुढे म्हणाले, "सर्वसामान्य जनतेने मला मतदान केले आहे. या निवडणुकीत कुणी काय केले हे मला माहीत आहे. माझ्याबद्दल जलसी असणायांना राजाभाऊ काय है दाखवून देतो. मतदारांनी दिलेला कौल मान्य आहे. आता काम करताना माजी आमदार म्हणून मर्यादा असणार आहेत. ज्यांना निवडून दिले त्यांना विकास कामात सहकार्य करू," असा शब्द राऊत यांनी दिला.