सोलापूर: पंढरपूर हे जिल्ह्यातील मोठे तीर्थक्षेत्र आहे, सोलापूर जिल्ह्याबद्दल बऱ्याच गोष्टी ऐकल्या होत्या आता प्रत्यक्षात काम करण्याची संधी मिळत आहे. जिल्ह्यातील धार्मिक पर्यटन स्थळांचा विकास करण्यावर माझा भर राहील असे मत नूतन जिल्हाधिकारी आशीर्वाद कुमार यांनी व्यक्त केले.
नूतन जिल्हाधिकारी यांचे पावणे बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन झाले. निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार आणि उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पदभार देण्याची शासकीय प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी मुख्यालयातील सर्वच उपजिल्हाधिकारी तहसीलदार उपस्थित होते.
पदभार पदभार घेतल्यानंतर नूतन जिल्हाधिकारी आशीर्वाद कुमार म्हणाले की, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील तत्कालीन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर जिल्ह्यातील सर्व खासदार आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला गती देणारे सुरू असलेले सर्वच कार्यक्रम यापुढेही तितक्याच प्रभावीपणे राबवणार आहे. नूतन जिल्हाधिकारी आशीर्वाद कुमार यांचे वडील मोठे शिवभक्त असल्याने त्यांनी सोलापूर शहरातील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात जाऊन प्रथम दर्शन घेतले. त्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले.