शीतलकुमार कांबळे
सोलापूर : दिल्लीतप्रदूषणाने कमाल पातळीही ओलांडली आहे. नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. दिल्लीतील वायू प्रदूषणाच्या पातळीमध्ये गेल्या तीन वर्षांतील उच्चांकी नोंदवण्यात आली आहे. या दिल्ली तसेच त्या परिसरात होणाºया प्रदूषणात मूळचे सोलापूरकरही गुदमरत आहेत. कामानिमित्त अनेक सोलापूरकर हे दिल्लीमध्ये स्थायिक झाले आहेत. त्यांनी दिल्लीतील प्रदूषणाविषयी ‘लोकमत’शी संवाद साधला.
दिवाळीत दिल्लीत फटाके फोडण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यामधून बाहेर पडणारा धूर वायू प्रदूषण वाढण्यास कारण ठरत आहे. याशिवाय हरयाणा व पंजाबमध्ये दरवर्षीप्रमाणेच पिकांचे अवशेष जाळण्यातूनही प्रदूषण होत आहे. दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी तिथे वाहनांकरिता अरविंद केजरीवाल सरकारने सम-विषम योजना सोमवारपासून लागू केली आहे.
दरवर्षी दिल्लीतलं प्रदूषण वाढतं. मात्र प्रदूषण कमी करण्यासाठी आपण काहीच पावलं उचलत नाही, असं म्हणत न्यायालयानं आपली नाराजी व्यक्त केली होती.
पंजाब, हरयाणात शेतकरी तण जाळतात. त्यामुळे दिल्लीत प्रचंड प्रदूषण होतं. लाखो लोकांचं आयुष्य धोक्यात आणणाºयांवर काय कारवाई केली जाते, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारांना विचारला होता.
बांधकाम करण्यावर बंदीअतिधोकादायक प्रदूषणाची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल कॅपिटल रिजनमध्ये (एनसीआर) कोणतीही बांधकामे करण्यावर बंदी घातली आहे. न्यायालयाकडून पुढील आदेश मिळेपर्यंत ही बंदी कायम राहील. तरीही बांधकामे सुरू ठेवणाºयांना १ लाख व कचरा जाळणाºयंना पाच हजारांचा दंड आकारण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.
सोलापूर आणि दिल्लीच्या वातावरणात खूप फरक आहे. तशी धूळ आपल्याकडेही आहे. मात्र, दिल्लीतील सध्याचे वातावरण खूप खराब झाले आहे. म्हणून कामाशिवाय मी घराबाहेर पडत नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याने काही औषधे जवळ ठेवली आहेत. दुपारी १२ ते सायंकाळी पाचदरम्यानचे वातावरण हे सारखेच वाटते.- अजय राजगुरू, नोएडा
दिल्लीत मी जिथे राहतो त्याच्या तुलनेत सोलापुरात झाडांचे प्रमाण जास्त वाटते. येथील प्रदूषणामुळे डोळ्यांतून पाणी येते. प्रदूषणाचे काही परिणाम लगेच जाणवत असून, काही परिणाम हे दीर्घकालीन असू शकतात. बाहेर पडताना मास्क वापरण्याशिवाय पर्याय नाही. येथील मेडिकल दुकानात ५० रुपयांपासून मास्क मिळतो.- बालाजी सग्गम, गुरुग्राम