सोलापूर : आजचं जग इन्स्टंट झालंय. खूप कमी वेळात आपलं काम व्हायला हवं, असं सगळ्यांनाच वाटतं. त्या काळी संगीत जसं तयार व्हायचं तसं आता होत नाही. कारण या डिजिटलच्या जमान्यात विचार कुणी करत नाही, असे मत ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी व्यक्त केले.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट यांच्यातर्फे आशा भोसले यांना ‘स्वामीरत्न’ हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्या सोलापुरात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी ‘लोकमत’ शी संवाद साधला.
आशा भोसले म्हणाल्या, जग जसं बदलतं तसं संगीतही बदलायला लागलं आहे. या बदलाला आपण थांबवू शकत नाही. लता दीदी, किशोरकुमार, मोहम्मद रफी यांच्या गीतांची जादू वेगळी होती, ती आता नाही. विचार करून संगीत दिले जात नाही. शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी आता मुलांकडे वेळ नाही. माझ्याकडे मुले संगीत शिकवा म्हणून येतात. त्यांना फिल्मी संगीत शिकायचं असतं. तुम्ही चित्रपटातील गाण्यात कशा गाता, असे विचारतात. हे शिकवून नाही तर मनातून यायला हवे. गाण्यामागची परिस्थिती काय आहे? अभिनेत्रीचा चेहरा कसा आहे? याचा विचार करावा लागतो.
आताच्या मुलांना काही खाण्याची पथ्यं पाळावी लागतात, असे सांगितले तर त्यांच्या चेहºयावरचे रंगच बदलतात. आपला आवाज चांगला राहण्यासाठी रियाज करायला हवा. ७५ वर्षे झाली मी गाणे गात आहे, तरीही मी आजही रियाज करते.
सध्याच्या सरकारविषयी प्रश्न विचारल्यावर आशा भोसले म्हणाल्या, आपल्याला आपले नातेवाईक, मुले, नातवंडांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. एक माणूस दिल्लीत राहून काम करतो. तो इतक्या मोठ्या देशाकडे कसा लक्ष देईल.
त्यांनी एखादा आदेश दिला तर त्याचे पालन होईलच, असे सांगता येत नाही. त्यांच्याकडे हजारो कामे असतात. ते फक्त देशातील लोकांसाठी काम करतात. परदेशात आपल्या लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे.
सर्व संगीतकार हे माझे गुरू- कुणी एक असा माझा गुरू नाही. ज्यांनी ज्यांनी मी गायिलेल्या गीताला संगीत दिले ते माझे गुरू आहेत. कारण त्यांनी मला शिकवलं ते मी शिकले. सुधीर फडके, पंजमदा, विश्वनाथ मोरे, वसंत पवार, वसंत प्रभू, पु. ल. देशपांडे यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले म्हणून ते माझ्यासाठी गुरूच आहेत. माझ्या वडिलांनी मी लहान असताना संस्कृत भाषेचे संस्कार माझ्यावर केले. यामुळे जिभेचा व्यायाम होतो, शब्द स्पष्टपणे उच्चारता येतात, असे आशा भोसले यांनी सांगितले.