सोलापूर : शहराचे वैभव असलेल्या एन.जी. मिल जागेवरील पुरातन इमारतींच्या पाडकामाची निविदा वस्त्रोद्योग महामंडळाने जाहीर केली आहे. मनपाच्या हेरिटेज वास्तूंच्या यादीत या इमारतींचा समावेश आहे. त्यामुळे मनपाचा बांधकाम परवाना विभाग पाडकामास ब्रेक लावू शकतो, असे स्पष्ट संकेत अधिकाºयांनी दिले आहेत.
एन. जी. मिलच्या इमारत पाडकामासाठी वस्त्रोद्योग महामंडळाने काढलेली निविदा १२ जुलै रोजी उघडण्यात येणार आहेत. पाडकाम करण्यापूर्वी मक्तेदाराने महापालिकेकडून परवानगी घ्यावी, असे या निविदेत नमूद करण्यात आले आहे. परंतु, या इमारतींच्या पाडकामाला इंटॅक शहरातील सामाजिक संघटनांनी विरोध केला आहे.
या इमारती १०० वर्षांपूर्वीच्या आहेत. सोलापूरचे वैभव नष्ट करू नका. डागडुजी केल्यानंतर या इमारती वापरात येऊ शकतात, असे या संघटनांचे म्हणणे आहे. दरम्यान, महापालिकेने शहरातील हेरिटेज वास्तूंची प्रारूप यादी तयार केली आहे. ही यादी मंगळवारी प्रसिद्ध होणार आहे. हेरिटेज कॉन्झर्व्हेशन समितीतील नावे निश्चित करण्यात आली आहेत. ही नावे शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत. या यादीमध्ये एन. जी. मिलच्या इमारतींचा समावेश आहे. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर सुनावणी होईल. हेरिटेज वास्तूंच्या पाडकामाचा निर्णय घेण्यापूर्वी हेरिटेज कॉन्झर्व्हेशन समितीचा अभिप्राय घेणे बंधनकारक राहणार आहे.
दरम्यान, इंटॅकच्या सदस्य श्वेता कोठावळे म्हणाल्या, एन. जी. मिलच्या इमारती पाडकामास परवानगी देऊ नये. हेरिटेज वास्तूंची यादी लवकरच जाहीर करावी, यासाठी मनपा आयुक्तांना पत्र देण्यात येणार आहे. वस्त्रोद्योग महामंडळाने निविदा काढली असली तरी मुळातच सर्व जबाबदारी मनपावर आहे. यासाठी लोकांचा पाठिंबा महत्त्वाचा आहे.
कोणत्याही वास्तूचे पाडकाम करण्यापूर्वी मनपाच्या बांधकाम विभागाकडून परवानगी घ्यावी लागते. एन. जी. मिलच्या वास्तू तर हेरिटेज आहेत. मक्तेदार बांधकाम परवाना विभागाकडे परवानगी मागेल. त्यावेळी सहायक नगर रचना कार्यालयावर यावर हरकत घेऊ शकते. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यामुळे पाडकामाचा निर्णय सहजासहजी होणार नाही. - महेश क्षीरसागर, उपअभियंता, सहायक नगर रचना, मनपा.
नरसिंग गिरजीमधील वास्तूंबाबत शनिवारच्या सर्वसाधारण सभेत भूमिका मांडून विरोध दर्शविला आहे. महापौरांनी आदेश दिल्याप्रमाणे हा विषय सभागृहात आल्यास शिवसेना निश्चितपणे पुरातन वास्तूंचे जतन करण्यासाठी आग्रही राहील. परंतु अशा प्रश्नांबाबत शहरवासीयांकडून देखील उठाव झाला पाहिजे, असे वाटते. नागरिकांचा दबाव गट बनल्यास नक्कीच अशा चुकीच्या गोष्टी टाळता येतील. मी समविचारी नागरिकांशी याबाबत चर्चा करणार आहे व हेरिटेज वास्तूंची यादी तत्काळ जाहीर करण्यासाठी आयुक्तांची भेट घेणार आहे.- गुुरुशांत धुत्तरगावकरनगरसेवक, शिवसेना.