वैराग : वैराग ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर होऊन सहा महिने होत आले, पण अधिकारी उपस्थितीचा लपंडाव अद्याप संपला नाही. लेखापालअभावी कारभार ठप्प झाला आहे.
सुरुवातीला चार महिने प्रभारी मुख्याधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे अडचणी आल्या. यामुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसून येत होते. दरम्यान, एक महिन्यापूर्वी पवार या कायम मुख्याधिकारी म्हणून हजर झाल्या आहेत. मात्र आता लेखापालअभावी कामकाजात अडचणी येत आहेत. आर्थिक व्यवहार करताना दोघांच्या सह्या आवश्यक आहेत. ३० ऑगस्ट रोजी लेखापालाची बदली झाली. २० दिवसांनंतरही नवीन लेखापाल रुजू झालेले नाहीत. त्यामुळे साधे दिवाबत्तीचे सामान देखील खरेदी करताना अडचणी येत आहेत.
-----
दररोज हजारो रुपयांचा महसूल जमा होत असूनही अजूनही कारभारात सुसूत्रता आलेली नाही. दोन दिवसांत लेखापाल हजर नाही झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा अरुण सावंत व समीर शेख यांनी दिला आहे.
----
पहिल्या लेखापालाचे दप्तर अपूर्ण आहे. ते पूर्ण झाल्याशिवाय नवीन लेखापाल आर्थिक पदभार घेण्यास उत्सुक नाहीत. याबाबत वरिष्ठांच्या कार्यालयाला माहिती कळवली आहे.
तसेच पहिल्या लेखापालाकडून दप्तर पूर्ण होऊन लवकरच नवीन लेखापालाची नियुक्ती होईल.
- वीणा पवार, मुख्याधिकारी
----
नवीन लेखापालासाठी आदेश काढला जाईल
ग्रामपंचायत व नगरपंचायतीच्या आर्थिक अभिलेखाबाबत खूप भिन्नता असते. तसेच पहिल्या लेखापालाने का पदभार दिला नाही व नवीन लेखापालाने का घेतला नाही. याबाबत चौकशी करून तत्काळ नवीन लेखापाल रुजू होण्याबाबतचा आदेश काढला जाईल, असे नगरविकास विभागाचे सहआयुक्त आशिष लोकरे यांनी सांगितले.
----