सोलापूर : सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सोमवारी आपल्या मित्राच्या पीएचडीच्या खुल्या मौखिक परीक्षेसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात हजेरी लावली. यावेळी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. अत्यंत बिझी शेड्युल असतानाही वेळ काढून मित्राच्या परीक्षेसाठी सोलापुरात हजेरी लावल्यानंतर दिग्दर्शक नागरिक मंजुळे यांच्या 'याराना'ची तारीफ होत आहे.
नागराज मंजुळे यांचे मित्र विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय, टेंभुर्णी येथील प्रा. संजय साठे यांच्या पीएचडीची खुली मौखिक परीक्षा सोमवारी दुपारी होती. प्रा. साठे यांनी सैराट चित्रपटात शिक्षकाची भूमिका साकारलेली आहे. ते मंजुळे यांचे गाववाले मित्र आहेत. प्रा. साठे यांनी प्राचार्य डॉ. महेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी पूर्ण केली आहे. सोमवारी त्याची अंतिम खुली मौखिक परीक्षा होती. त्यासाठी खास मंजुळे हे उपस्थित राहिले.
परीक्षा सुरू होण्यापूर्वी मंजुळे यांनी कुलगुरू दालनात येऊन डॉ. मृणालिनी फडणवीस यांची भेट घेऊन मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी कुलसचिव योगिनी घारे यांच्यासह डॉ. महेंद्र कदम, डॉ. केदारनाथ काळवणे, प्रा. साठे, डॉ. मलिक रोकडे, डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. दत्ता घोलप आदी उपस्थित होते.