सोलापूर: एकीकडे मनपाकडून वेळेवर अतिक्रमणे काढली जात नाहीत, त्याला विरोधही होत आहे, त्यामुळे रस्त्यांची कामे वेळेत होत नाहीत, तरीही मक्तेदाराला दरवाढ (प्राईस एस्क्लेशन) द्यावी लागत आहे़ यामुळे हा मक्ता रद्द करण्यासाठी आयुक्तांनी सध्या सुरू असलेल्या रस्त्याची कामे ३१ मेपर्यंत संपवा, असा आदेश दिला़ तीन-चार दिवसांपूर्वी बांधकाम, अतिक्रमण, भूमी-मालमत्ता अधिकार्यांसमवेत आयुक्तांनी नगरोत्थान योजनेतील रस्ते कामाचा आढावा घेतला़ युनिटी इन्फ्रा यांना २३८ कोटींचा मक्ता दिला असून मेहूल कन्स्ट्रक्शन सोलापुरात काम करीत आहे़ त्यामुळे त्यांच्या वतीने मेहूल पटेल बैठकीस हजर होते़ ज्या रस्त्याची कामे आहेत तेवढीच संपवा, नव्याने कोणताही रस्ता करु नका, असे आयुक्त म्हणाले़ त्यामुळे जी अर्धवट कामे आहेत ती सध्याच्या मक्तेदाराकडून पूर्ण करुन घेतली जातील आणि कालांतराने अतिक्रमणे ज्यावेळी निघतील त्यावेळी त्या त्या कामाच्या निविदा काढून रस्ते केले जातील, असे आयुक्तांनी सांगितले़ यामुळे २३८ कोटींचा रस्ता लवकरच रद्द होणार आहे़ अतिक्रमणामुळे तसेच भूसंपादनामुळे देखील कामे रखडली आहेत़ मंगळवारी सकाळी आयुक्तांनी परिवहन सभापती आनंद मुस्तारे, प्रभारी सहायक नगररचना संचालक महेश क्षीरसागर आणि नगर अभियंता जी़ एम़ दुलंगे यांच्यासमवेत शहरातील प्रमुख मार्गांची पाहणी करुन काही ठिकाणी रस्त्यामध्ये असलेले आयलॅण्ड कमी करण्याबाबत सूचना दिल्या़ शहरातून व्हॉल्व्हो बस फिरण्यासाठी अडचणी येत असल्यामुळे याचा काही मार्गावरील आयलँडचा आकार कमी केला जाणार आहे़
-----------------------
नालेसफाई ३१ मेपूर्वी करा ४आयुक्तांनी दुपारी मनपामध्ये दोन बैठका घेतल्या़ नगरोत्थान रस्ते आणि मान्सूनपूर्व कामांचा आढावा त्यांनी घेतला़ मनपाच्या १ ते ८ झोनच्या अधिकार्यांनी ३१ मेपूर्वी नालेसफाई, चेंबरमधील गाळ काढणे आदी कामे करावीत, त्याचे नियोजन कार्यालयाकडे पाठवावे, अशा सूचना आयुक्तांनी अधिकार्यांना दिल्या़
-----------------------------
आम्ही वेळेत अतिक्रमणे काढू शकत नाही़ त्यामुळे मक्तेदाराला नाहक प्राईस एस्क्लेशन (दरवाढ) द्यावे लागत आहे़ यामुळे मनपाला कोट्यवधींचा भुर्दंड सहन करावा लागत आहे़ नगरोत्थान योजनेतील २३८ कोटींपैकी सध्या सुरू असलेल्या रस्त्यांची कामे ३१ मेपर्यंत संपवा, सर्व सुविधा त्या रस्त्यावर द्या़ -चंद्रकांत गुडेवार आयुक्त