सोलापूर : शहरातील कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवारी ६१ रूग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल बुधवारी प्राप्त झाला. त्यात तिघे जण पॉझिटिव्ह आढळून आले तर ५८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. नई जिंदगी नागरी आरोग्य केंद्राच्या हद्दीतील दोन तर दाराशा हॉस्पीटलच्या हद्दीतील एक रूग्ण आहेत.
दरम्यान, सध्या १७ रूग्णांना घरातच विलगीकरण करण्यात आले आहे. आतापर्यंत सोलापूर शहरात कोरोना बाधित असलेले रूग्ण ३४ हजार ५७२ तर आजपर्यंतची मृतांची संख्या १५१७ वर पोहोचली आहे. शहरात कोरोना बाधित असलेल्यांची संख्या १७ आहे तर रूग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या ३३ हजार ३८ एवढी आहे.
सध्या शहरात कोरोना रूग्ण वाढत असल्याने महापालिकेच्या आराेग्य विभागाने आवश्यक त्या सेवासुविधा सज्ज ठेवल्या आहेत. शिवाय शासकीय रूग्णालयानेही वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून ठेवली आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, सर्दी, ताप, खोकला व इतर आजारांची लक्षणे दिसून आल्यास संबंधित नजीकच्या डॉक्टरांना भेटून औषधोपचार करून घ्यावेत असे आवाहन महापालिका आरोग्य विभागाने केले आहे.