सोलापूर : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतून वर्षाला सहा हजार रुपयांचा लाभ शेतकºयांना देण्यात येत आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे १२ लाख ३३ हजार शेतकºयांची नावे आली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी उत्तरप्रदेश येथील गोरखपूर येथून शेतकºयांना या सन्मान निधीचे वितरण स्वत: करणार आहेत. त्याचवेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात सोलापूर जिल्ह्यातील शेतकºयांना सन्मान योजनेचा लाभ देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या टप्प्यात शेतकºयांना या योजनेतून दोन हजार रुपयांचा मदत निधी त्यांच्या बँक खात्यात देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधानांच्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गतीने कामकाज सुरू केले आहे. आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ४ लाख ९९ हजार शेतकरी कुटुंबांना या योजनेसाठी प्राथमिक स्तरावर पात्र ठरविण्यात आले आहे. यापैकी २ लाख १७ हजार शेतकºयांची संपूर्ण माहिती बँक खात्यासह आॅनलाईनवर नोंदविण्यात आली आहे. उर्वरित शेतकºयांची यादी व बँक तपशीलही आठ दिवसात नोंदणी होण्याची शक्यता आहे.
पहिल्या टप्प्यात पात्र ठरलेल्या शेतकºयांना किमान दोन हजार रुपयांचा सन्मान निधी देण्याचा शुभारंभ रविवारी होत आहे. गोरखपूर येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात लाईव्ह करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील होणारा शेतकºयांचा सन्मानही लाईव्ह करण्यात येत आहे.
निधी जमा करण्यात अडचणपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ फेब्रुवारी पर्यंत शेतकºयांना सन्मान योजनेचा लाभ देण्याची भूमिका घेतली आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने प्रयत्नही सुरू केले आहेत; मात्र अजूनही बहुतांश शेतकºयांचा बँक तपशील प्राप्त नसल्याने शेतकºयांना थेट त्यांच्या खात्यात सन्मान निधी जमा करण्यात अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ठोस काम दिसण्याची शक्यता आहे.