सोलापूर : महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, मराठवाडा आणि कर्नाटक वासीयांचे मुख्य जंक्शन म्हणून ओळखल्या जाणाºया सोलापूररेल्वे स्थानकास श्री सिद्धेश्वर रेल्वे स्थानक किंवा सिद्धरामेश्वर रेल्वे स्टेशन असे नामकरण करण्याची मागणी सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी मंगळवारी लोकसभेत केली.
दिल्ली येथे लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनादरम्यान सोलापूरचे खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी यांना उपसभापती राजेंद्र अग्रवाल यांनी बोलण्याची संधी दिली. खासदार महास्वामी यांनी सोलापूर रेल्वे स्थानकास श्री सिद्धेश्वर किंवा सिद्धरामेश्वर असे नामकरण करण्याची मागणी केली. याचवेळी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
येत्या दोन-तीन दिवसात केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल व राज्यमंत्री अंगडी यांना समक्ष भेटून या मागण्यांसंदर्भात पाठपुरावा करणार आहे, त्याशिवाय सोलापूर विभागातील रेल्वे खात्यासंदर्भात असलेल्या विविध मागण्या, विकासकामासाठी निधीची मागणी व प्रश्न घेऊन ते सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी सांगितले.