संतोष आचलारे
सोलापूर : मयत व पत्ता बदल करून स्थलांतरित झालेल्या १५ हजार ४६२ मतदारांची नावे लोकसभा निवडणुकीच्या मतदार यादीतून डीलीट करण्यात आली आहेत. मतदान केंद्रात शौचालय, पाणी व वीज आदी मूलभूत सुविधा पुरविण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी स्नेहल भोसले यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. १ नोव्हेंबर २०१८ ते ३१ जानेवारी २०१९ पर्यंत मयत व पत्ता बदल झालेल्या मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. यात ८ हजार ६०८ पुरुष तर ६ हजार ८५३ महिला मतदारांचा समावेश आहे. मतदार नोंदणी अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या दोन दिवसीय उपक्रमात दहा हजार मतदारांनी नाव नोंदणीसाठी अर्ज केला आहे. त्यांची नावे यादीत घेण्यात येत आहेत. येत्या शनिवार व रविवारी पुन्हा नावनोंदणी शिबिराचा विशेष उपक्रम हाती घेण्यात येत असल्याचेही भोसले यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीसाठी मतदान घेण्यासाठी सोलापूरला देण्यात आलेल्या मशीन अन्य जिल्ह्यास देण्यास आल्या आहेत. हैदराबाद येथून नवीन मशीन आणण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील टीम गेली असून, दोन दिवसांत तेथून व्हीव्हीपॅट मशीन येणार आहेत. मशीन आल्यानंतर त्यांची तपासणी करण्यासाठी मोहीम घेण्यात येणार असल्याचेही निवडणूक उपजिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले.
हे आहेत वगळलेले मतदारकरमाळा : ४३९, माढा : २०२७, बार्शी : १६४, मोहोळ : १६३१, सोलापूर शहर उत्तर : २९४, सोलापूर शहर मध्य : २७२,अक्कलकोट : १६४२, दक्षिण सोलापूर : १७६८,पंढरपूर : ३३२, सांगोला : २०३०, माळशिरस : ४८६३ विधानसभा मतदारसंघनिहाय वगळण्यात आलेल्या मतदारांची संख्या अशी आहे.