सोलापूर : मनपाचा मिळकतकर थकविणाºया बड्या थकबाकीदारांची नावे रविवारपासून शहरातील प्रमुख चौकांमध्ये झळकणार आहेत. या थकबाकीदारांची नावे मक्तेदाराला देण्यात आली आहेत.
महापालिकेच्या शहर आणि हद्दवाढ कर संकलन विभागाकडून वसुली मोहिमेला गती देण्यात आली आहे. वसुली पथकाने शहरात ५० हून अधिक नागरिकांचे नळ कनेक्शन बंद केले आहे. शाळा, रुग्णालयातील खोल्या सील केल्या आहेत. थकबाकीवर दरमहा दोन टक्के शास्ती आकारण्यात येते. आयुक्त तावरे यांनी थकबाकीची रक्कम एकवट भरल्यास शास्तीमध्ये ७५ टक्के सवलत देण्याचा निर्णय जाहीर केला.
त्यामुळे यंदा विक्रमी वसुली आहे. मात्र काही मिळकतदार अद्याप प्रतिसाद द्यायला तयार नाहीत. एक लाख रुपयांहून अधिकचा कर थकविणाºयांची नावे डिजिटल फलकावर लावण्यात येतील, असे मनपाने जाहीर केले होते. त्याची कार्यवाही सुरू झाली आहे. शहर कर संकलन अधिकारी पी.व्ही. थडसरे म्हणाले, एक लाखापेक्षा अधिकचा कर थकविणारे ३५० लोक आहेत. शनिवारी सायंकाळपर्यंत त्यांनी कर न भरल्यास त्यांची नावे भर रस्त्यावर लावली जातील. त्यांच्यावर आणखी कडक कारवाई होईल.
हद्दवाढ विभागाचे वरातीमागून घोडे- शहर विभागाने थकबाकीदारांची नावे निश्चित करुन डिजिटल लावण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण केली. हद्दवाढ विभाग कर संकलन विभागाने मात्र अद्यापही निविदा प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. शहरातील नावे रविवारपासून चौकाचौकात झळकणार आहेत. पण हद्दवाढ विभागातील नावांची यादी करण्यातच बराच वेळ गेल्याचे अधिकारी सांगत आहेत. या विभागात गोंधळाचे वातावरण असल्याची नेहमीच चर्चा असते. त्यामुळे अनेक लोक आपल्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी शहर कर संकलन विभागात अथवा उपायुक्त अजयसिंह पवार यांच्याकडे धाव घेत असल्याचे पाहायला मिळते.
या ठिकाणी लागणार डिजिटल फलक - विडी घरकूल, विजापूर वेस, किडवाई चौक, पार्क चौक, गेंट्याल टॉकीज, कर्णिक नगर, साखर पेठ, घोंगडे वस्ती, प्रियंका चौक, विश्रांती चौक, शाहीर वस्ती, दक्षिण सदर बझार, उत्तर सदर बझार, जोडभावी पेठ, गोल्डफिंच पेठ, मुरारजी पेठ, उत्तर कसबा, दक्षिण कसबा पूर्व मंगळवार, पश्चिम मंगळवार पेठ, सिध्देश्वर पेठ, बेगम पेठ, शनिवार पेठ.
यंदा विक्रमी वसुलीमागील वर्षी २७ फेब्रुवारी रोजी शहर कर संकलन विभागाने ४९ कोटी रुपये वसूल केले होते. मार्चअखेर ६४ कोटींंची वसुली झाली होती. यंदा २७ फेब्रुवारीअखेर ७० कोटी रुपये वसूल झाले आहेत. हद्दवाढ विभागात २७ फेब्रुवारीअखेर ४० कोटी तर यावर्षी ५८ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. शास्ती ७५ टक्के माफ करण्याच्या सवलतीचा नागरिकांनी लाभ घेतल्याचे थडसरे म्हणाले.
शास्ती माफीला मुदतवाढ ?थकीत करावरील शास्तीमध्ये ७५ टक्के सवलत द्यायची योजना २९ फेब्रुवारीपर्यंतच आहे. शनिवारी सर्व कर संकलन केंद्र सुरू राहणार आहेत. शास्ती माफीला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी एमआयएमने केली आहे. आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.