सोलापूर : प्रकाश अन् आनंदाचा सण असलेल्या दिवाळीत कोरोना महामारीने माघार घेतल्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून खरेदीसाठी सोलापुरातील सर्वच बाजारपेठा हाऊसफुल्ल असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी वसुबारसच्या दिवशी गोवत्स पूजनाने दीपावली सुरू झाली. उद्या धनत्रयोदशी आहे.
नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन हे शनिवार १४ नोव्हेंबर रोजी तर सोमवार १६ नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडवा व भाऊबीज हे यावर्षी एकाच दिवशी आल्याने यंदा दिवाळी दोनच दिवस असल्याचे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले. दरम्यान, वर्षभरातील सर्व सणांमध्ये दीपावली हा सण सर्वात मोठा असा उत्सव आहे. इतर सर्व सण-उत्सवांपेक्षा दिवाळीच्या चार दिवसांत होणारी उलाढाल सर्वांनाच आनंद देणारी असते. याचे कारण नरक चतुर्दशी ते कार्तिक शु. प्रतिपदा या तीन दिवसांत सर्व जण मौजमजा करतात. गोडधोड खातात, आनंदी वातावरणात राहतात, बळीराजाची इच्छा पूर्ण होते, सर्वत्र चैतन्यमय वातावरण असते. त्यामुळे दिवाळीला विशेष महत्त्व आहे.
घरासोबतच दुकानांची स्वच्छता, दिव्यांची रोषणाई, फराळाचे पदार्थ, गोडधोड, अभ्यंगस्नान, आप्तेष्टांच्या भेटीगाठी, याशिवाय पतीने पत्नीसाठी, भावाने बहिणीसाठी, याचबरोबर मालक हे कर्मचाऱ्यांसाठी भेटवस्तू देऊन स्नेहभाव वाढवितात. सोलापूर शहर व परिसरात सर्वत्र घरोघरी गोवत्स पूजन करण्यात आले. याचबरोबर सौभाग्यवती स्त्रियांनी उपवास पकडून देवाकडे कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली.
असा आहे लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त...
शनिवार १४ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे. दुपारी १.५० ते ४.३, सायंकाळी ६ ते रात्री ८.२५, रात्री ९ ते ११.२० या शुभवेळेत लक्ष्मीपूजन करावे, असे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. याशिवाय १६ नोव्हेंबर रोजी वहीपूजन आहे. पहाटे २ ते ३.३५, पहाटे ५.१५ ते ८, सकाळी ९.३० ते ११ या वेळेत वहीपूजन करणे लाभदायक ठरणार असल्याचे दाते यांनी सांगितले.
बाजारात खरेदीचा उत्साह...
दिवाळीनिमित सोलापूर शहरातील सर्वच बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी लोकांनी मोठी गर्दी केली आहे. कोरोनानंतरही बाजारपेठेत खरेदीचा उत्साह मोठ्या प्रमाणात आहे. कपडे, सोने-चांदी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, जागा, घर खरेदी, ज्वेलरी, चारचाकी व दुचाकी वाहनांसोबत सर्वच क्षेत्रात खरेदीचा उत्साह मोठा दिसून येत आहे. कोरोनानंतरही बोनस, पगार वेळेवर होत असल्याने बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याचेही पहावयास मिळत आहे.