विकास कामे व समाजाचे हित जोपासल्याने सलग पाचव्यांदा परिचारक गटाचे ९ पैकी ५ उमेदवार निवडून देऊन मतदारांनी जनतेची सेवा करणारी संधी दिली आहे. २७ जानेवारी रोजी सरपंच पदांचे आरक्षण जाहीर केले होते. हे आरक्षण अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव निघाले होते. मात्र परिचारक गटातील ९ पैकी ५ उमेदवार निवडून येऊनही परिचारक गटातून अनुसूचित जातीची महिला निवडून आली नसल्याने सरपंचपदाचा पेच निर्माण झाला होता. तर शिंदे व भालके गटाच्या ९ पैकी ४ उमेदवारांमधून अनुसूचित जातीच्या जागेवर अमृता गायकवाड या निवडून आल्याने सरपंचपदावर त्यांनी दावा घोषित केला होता. परंतु ९ पैकी ५ असे संख्याबळ असतानाही २७ जानेवारीला जाहीर केलेल्या सरपंच पदाच्या आरक्षणावर परिचारक गटाने आक्षेप घेऊन ॲड. विजय जाधव व ॲड. सारंग आराधे यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
त्या याचिकेनुसार फेरसुनावणी घेत जाहीर केलेल्या सरपंचपदांच्या आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिली. त्यानंतर २२ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पार पडलेल्या सरपंच आरक्षण सोडतीमध्ये नारायण चिंचोलीसाठी ओबीसी सर्वसाधारण हे आरक्षण निघाले. यात ओबीसीचे उमेदवार निवडून आल्याने सरपंचपद परिचारक गटाकडे असल्याचे चित्र स्पष्ट झाले. यामुळे ग्रामपंचायतीवर परिचारक गटाने सलग पाचवा विजय मिळाल्याने गावातून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती लक्ष्मण धनवडे, शिवाजी गुंड, धर्मा नलवडे, विष्णू माने, प्रा. दत्तात्रय मस्के, गहिनीनाथ चव्हाण, विठ्ठल माने, नितीन मस्के, विजय कोळेकर आदी उपस्थित होते.