अकलूज : अकलूज येथे १७ एप्रिल रोजी होणाºया पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांच्या सभास्थळाची आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पाहणी करुन सभेच्या तयारीचा आढावा घेतला.
शंकरनगर-अकलूज रोडवरील क्रीडा संकुलासमोरील मैदानामध्ये सकाळी ९ वाजता माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले आहे़ यासाठी २५ एकर क्षेत्र असलेल्या या मैदानात जमीन सपाटीकरण व साफसफाईचे काम सुरु झाले आहे. या मैदानातील सभेसाठी व्यासपीठ व २ लाख नागरिकांच्या बैठकीची व्यवस्था होईल.
यावेळी सहकार महर्षि कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मदनसिंह मोहिते-पाटील, राजकुमार पाटील, माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील, विजयराव चौगुले, शिवामृतचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील, अविनाश कोळी, सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, मोहन डांगरे आदींसह भाजप-शिवसेना महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सभेची जय्यत तयारी होत असून, आता नागरिकांना प्रतीक्षा आहे ती प्रत्यक्ष मोदी यांच्या भाषणाची व त्यांच्या उपस्थितीत खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे भारतीय जनता पक्षात प्रवेश होणार का, याची उत्सुकता आहे.