सोलापूर : गणित विषय आवडीने अभ्यासणारे विद्यार्थी नेहमीच उच्च श्रेणीत येतात़ कदाचित गुणवत्ता यादीतही येतात़ पण हे प्रमाण एकूण विद्यार्थी संख्येच्या तुलनेत अत्यल्प आहे़ दुसºया बाजूला ‘गणित विषय अतिशय अवघड व आपल्याला जमणार नाही’ असा समज करून या विषयापासून दूर राहणाºयांची संख्या सोलापुरात सर्वाधिक आहे, म्हणून विद्यार्थ्यांसाठी ज्ञानरचनावादी गणित प्रयोगशाळा निर्माण करण्यासाठी शासनाने पावले उचलली पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे सोलापूर जिल्हा उच्च माध्यमिक गणित शिक्षक संघाने.
२२ डिसेंबर हा थोर गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म दिवस ‘राष्ट्रीय गणित दिवस’ म्हणून साजरा केला जातो़ या दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा उच्च माध्यमिक गणित शिक्षक संघाच्या सदस्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधत इतर विषयांप्रमाणे अपेक्षा व्यक्त केल्या.
आजच्या स्पर्धात्मक, संगणकीय युगात गणिताशिवाय तरुणोपायी नाही़ म्हणून शिक्षकांनी व्यावहारिक व अत्यंत सोप्या गणिताच्या मूलभूत प्रक्रिया साधनांचा वापर करून सहजपणे विद्यार्थ्यांसमोर ठेवून ‘हा विषय मी सहजपणे शिकू शकेन’ असा आत्मविश्वास निर्माण करणे, ही मूलभूत गरज आहे़ विद्यार्थ्याला एखाद्या विषयाची भीती वाटत असेल तर शिकण्यातील रस कमी होऊन तो त्यापासून लांब पळू लागतो़ पण तोच विषय जर आवडायला लागला तर तो सोपाही वाटतो, शिकण्यातून आनंदही मिळविता येतो.
गणित प्रयोगशाळा- गणिताच्या शिक्षकाला खडू-फळा न वापरता शिकविणे अवघड असते, हा सामान्यत: सर्व शिक्षकांचा अनुभव आहे़ गणितामध्ये असलेली आकडेमोड, सूत्रांचा वापर, कूट प्रश्न सोडविण्यासाठी लागणाºया अमूर्त आणि प्रात्यक्षिकांचा अभाव यामुळे गणित हा विषय अमूर्त वाटून त्याबद्दल गोडी निर्माण होत नाही़ प्रसिद्ध चिनी म्हणीप्रमाणे, मी ऐकलं-मी विसरलो, मी पाहिले-माझ्या लक्षात राहिले, मी केले-मला समजले़ यातील ‘करणे’ व ‘समजणे’ होण्यासाठी गणित शिक्षकांनी नवनिर्मितीचा ध्यास घेऊन विद्यार्थ्यांना सक्रिय करणे आवश्यक आहे़ यासाठी गणित सक्रिय पद्धतीने शिकविण्यासाठी गणित प्रयोगशाळांची नितांत आवश्यकता आहे़
गणिताविषयी गैरसमज - गणित विषय रुक्ष व कठीण आहे़ गणित विषय आत्मसात करण्याची क्षमता मोजक्या व्यक्तींमध्येच असते, असा गैरसमज गणितात अपयशी ठरलेल्यांकडून कळत-नकळत पसरवला जातो़ अशा प्रकारच्या गैरसमजामुळे विद्यार्थ्यांच्या मनात गणित विषयाची नावड कायमपणे होते़ यासाठी शिक्षक, विद्यार्थी व पालक यांनी हे एकदा मान्य केले पाहिजे की, गणित विषय फार अवघडही नाही व तो फार सोपाही नाही़ तर गणित विषय ‘वेगळा’ आहे़ हे का एकदा समजावून घेतले की, तुमचा पालक किंवा शिक्षक म्हणून पाल्य किंवा विद्यार्थी यांच्याशी योग्यप्रकारे संवाद सुरू होईल़