नरखेड : मोहोळ तालुक्यात सीना आणि भोगावती नद्यांच्या संगमाजवळ वसलेले प्राचीन भोयरे हे गाव असून, येथील ग्रामदैवत श्री जगदंबा देवीचा पांरपरिक दगड उधळण्याचा खेळ रंगला. यात कित्येक जण जखमीही झाले.
भोयरे गावामध्ये धूलिवंदनदिनी साधारण दुपारी चार ते पाचच्या दरम्यान श्री जगदंबा देवीच्या पावन नगरीमध्ये आलेले भाविक-भक्त मंदिरातून दर्शन घेऊन पुजाºयासह भोगावती नदीच्या दिशेने जातात. नंतर नदीमध्ये लहान मुलांच्या कुस्त्या होतात. त्यानंतर सर्व भाविक गावाच्या वेशीवर येऊन दोन गटात विभागून थोडे दगड फेकतात. यानंतर ते दोन्हीही गट जगदंबा मंदिराच्या दिशेने मार्गस्थ होतात.
एक गट मंदिराच्या गाभाºयावर तर दुसरा गट मंदिराच्या पायथ्याशी उभा असतो. पुजारी मंदिरात पोहोचून खेळास परवानगी देताच दोन्ही गटांमध्ये तुफान दगडांची उधळण सुरू होते. या दोन्ही गटांमध्ये अंतर फक्त १५० ते २०० फूट असते.
साधारण हा खेळ २० मिनिटे चालू असतो. पुजाºयांनी खेळ बंदचा इशारा करताच दोन्हीही गट दगड उधळणे बंद करून मंदिरात दर्शन घेण्यासाठी रांगा लावतात. या खेळामध्ये भाविक-भक्तांना अल्प आणि किरकोळ प्रमाणात दगड लागतात.