बार्शी : एनएमके १ गोल्डन सीताफळाचे निर्माते डॉ. नवनाथ कसपटे यांच्या संशोधनाची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली असून त्यांना किंगडम ऑफ टोंगा या देशातील राष्ट्रकुल विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय दर्जाची डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी बहाल करून त्यांना सन्मानित केले.
माकंगा येथील राष्ट्रकुल व्यावसायिक विद्यापीठाच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथील कार्यक्रमात ही पदवी बहाल केली. यामुळे डॉ. कसपटे यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. डॉ. कसपटे यांना यासंदर्भात मिळणारी ही दुसरी डॉक्टरेट असून, यापूर्वी त्यांना बेंगलोर विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले आहे. दिल्ली येथील समारंभात विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रिपू रंजन सिन्हा यांच्याहस्ते कसपटे यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी बहाल केली.
यावेळी विद्यापीठाचे संस्थापक सदस्य प्रा. राकेश मित्तल, डॉ. प्रियदर्शनी नायर, केंद्रीय मंत्रालय प्रतिनिधी सैफी अख्तर यांची उपस्थिती होती. किंगडम ऑफ टोंगा हा देश ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागातील एक छोटा द्विपसमूह देश आहे. तो दक्षिण प्रशांत महासागरातील १७६ लहान बेटांवर वसला आहे. टोंगा येथील कृषी विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. कौसा यांच्या सूचनेवरुन डॉ. कसपटे यांना ही पदवी बहाल केली. विशेष म्हणजे डॉ. कसपटे यांना या सन्मानाबरोबरच टोंगा देशाचे विशेषाधिकार देण्यात आले.
----
फोटो : १२ कसपटे
जागतिक स्तरावरील आंतरराष्ट्रीय पदवी कुलगुरू डॉ. रिपू रंजन यांच्या हस्ते स्वीकारताना डॉ. नवनाथ कसपटे.