सोलापूर : नऊ मैत्रिणी, दहा जिल्हे, २४ तालुके, १८६८ किलोमीटरचा प्रवास करत सतत सहा दिवस बाइक चालवत निघाल्या आहेत रणरागिणी. शिवतीर्थ पोवई नाका येथून सुरू झालेला प्रवास रविवारी सोलापुरात काही काळासाठी विसावला होता. साडेतीन शक्तिपीठे अंबाबाई, तुळजा भवानी, रेणुका माता आणि सप्तश्रुंगी देवींना साकडे घालण्यासाठी स्त्री शक्तीचा जागर करत या रणरागिणी निघाल्या आहेत.
रस्ता सुरक्षा, महिलांचे आरोग्य त्यातही ब्रेस्ट कॅन्सरबाबत जागरुकता वाढविण्यासाठी, सर्वांचेच लक्ष या विषयाकडे नेण्यासाठी या नऊ महिला साडेतीन शक्तिपीठांचा प्रवास करत आहेत. १८६८ किलोमीटरच्या या प्रवासात अनेक संकटांना सामना करत त्या एक-एक पाऊल पुढे टाकत आहेत. सोलापुरातील तुळजापूर नाक्याजवळ या रणरागिणींनी काही काळ विसावा घेतला. लोकमतशी संवाद साधत त्यांनी आपला प्रवास उलगडला.
साताऱ्यातील शिवतीर्थ, श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर येथे दर्शन घेऊन रविवारी रात्री या महिला सोलापुरात दाखल झाल्या. रात्री 10. वाजता त्या सोलापुरातून तुळजापूरकडे निघाल्या. तुळजापूर येथील श्री भवानी मातेचे दर्शन घेऊन त्या माहूरगड (नांदेड), कारंजा (वाशिम), औरंगाबाद, वणी सप्तश्रृंगी देवी (नाशिक) येथून पुन्हा शिवतीर्थ पोवई नाका (सातारा) येथे जाणार आहेत.
राइडमध्ये यांचा समावेश
मनीषा फरांदे, मोना निकम, शुभांगी पवार, अंजली शिंदे, अर्चना कुकडे, ज्योती दुबे, केतकी चव्हाण, श्रावणी बॅनर्जी, भाग्यश्री केळकर यांच्यासोबत उर्मिला भोजने आणि रेणू येळगावर यांचा समावेश आहे.
--------
अडचणींवर मात
दूरचा प्रवास करताना पाऊस आणि खड्डे यांचा सामना करणे सर्वांत अवघड आहे. महामार्गावर बाइक चालवणे कठीण काम असतानाही हे आव्हान आम्ही यशस्वी पेलत आहोत. बाइक चालविताना हात, पाठ आणि पाय दुखावतात. हे टाळण्यासाठी व्यायाम करत आहोत. इतक्या संकटांचा सामना करत असताना आम्ही सोलापूरमध्ये आलो. येथे पोहोचण्याचा आनंद वेगळाच आहे, अशी प्रतिक्रिया एका रणरागिणीने दिली.