सोलापूर : एखाद्या अडचणीच्या वेळी क्षणात घेतलेला निर्णय एखाद्याचे प्राण वाचवू शकतो, असाच एक प्रकार कामती येथे घडला. एका हॉटेलमध्ये एक महिला अचानक खाली पडली. त्या महिलेला दयानंद महाविद्यालयातील एनसीसीचा विद्यार्थी संतोष पाटील याने त्वरित सीपीआर देऊन तिचे प्राण वाचविले. महाविद्यालयात मिळालेल्या प्रशिक्षणामुळे त्या महिलेचा जीव वाचला.
संतोष पाटील हा विद्यार्थी येथील आपल्या बेगमपूर येथून सोलापूरकडे जात होता. कामती येथे एका हॉटेलमध्ये तो थांबला होता. तिथे आलेली एक महिला अचानक कोसळली. क्षणाचाही विलंब न लावता संतोषने त्या महिलेला हलवून पाहिले. महिलेचा श्वास थांबला होता. म्हणून संतोषने सीपीआर दिला. त्यावेळी तिथे असलेल्या नागरिकांना त्या महिलेचा तळवे घासले. काही वेळातच ती महिला श्वास घेऊन लागली व तिने डोळे उघडले.
काही वेळ तसेच पडून राहिल्यावर ती महिला खुर्चीवर बसली. तिथे असलेल्या नागरिकांनी त्या महिलेला पाणी व चहा आणून दिला. थोड्या वेळात त्या महिलेचा नातू तिथे आला. त्याने त्या महिलेला हॉस्पीटलमध्ये नेले. संतोष पाटील याने त्वरित सीपीआर दिल्यामुळे त्या महिलेचा जीव वाचला.