डी. एस. गायकवाड
टेंभुर्णी : माढा विधानसभा मतदारसंघातील संजयमामा शिंदे यांच्या सर्व विरोधकांनी मतभेद बाजूला ठेवून शिंदे यांना होमपीचवर घेरल्याने त्यांना या हक्काच्या मतदारसंघातून केवळ सहा हजारांचे मताधिक्य मिळाले. या उलट मोहिते-पाटील कुटुंबीयांनी माळशिरसमधून एक लाखाचे मताधिक्य रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना दिल्यामुळेच संजय शिंदे यांना पराभवास सामोरे जावे लागले आहे.
माढा विधानसभा मतदारसंघात माढा तालुक्यातील ७८ गावांचा समावेश आहे. या गावांमधून शिंदे यांना केवळ १७ हजारांचे मताधिक्य मिळविण्यात यश आले. माढा तालुक्यातील टेंभुर्णी, पिंपळनेर, बेंबळे, मानेगाव यासह छोट्या-मोठ्या गावांतून शिंदे यांना बºयापैकी लीड मिळाली. परंतु माढा, मोडनिंब, उपळाई (ब) या मोठ्या गावांमधून निंबाळकर यांना मतदारांनी भरभरून मते दिली. तालुक्यातील शिंदे विरोधक प्रथमच एकसंध राहून प्रचारात उतरले होते. त्यामुळे अनेक गावात घासून मतदान झाले. त्यामुळे संजयमामा शिंदे यांना माढा तालुक्यातील ७८ गावांमधून केवळ १७ हजारांची आघाडी मिळाली.
या विधानसभा मतदारसंघात माळशिरस तालुक्यातील १४ गावांचा समावेश आहे. यामध्ये महाळुंग व बोरगाव गटाचा समावेश आहे. या १४ गावात मोहिते-पाटलांचे वर्चस्व असल्याने येथे एकतर्फी मतदान झाले. येथून नाईक-निंबाळकर यांना सुमारे २२ हजार मते मिळाली तर संजयमामा शिंदे यांना केवळ ५ हजार मतांवर समाधान मानावे लागले. निंबाळकर यांना महाळुंग व बोरगाव गटातील १४ गावांतून १७ हजारांची लीड मिळाली. यामुळे माढा तालुक्यातील ७८ गावांतून शिंदे यांना मिळालेली सतरा हजारांची लीड न्यूट्रल झाली.माढा विधानसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील ४२ गावांचा समावेश आहे. या ४२ गावांमधील करकंब येथे घासून मतदान झाले तर भोसे गावातून शिंदे यांना सुमारे २३०० एवढे मताधिक्य मिळाले. पंढरपूर तालुक्यातील ४२ गावांमधून मिळालेली सुमारे ६ हजारांची लीड हीच माढा विधानसभा मतदारसंघातील शिंदे यांचे मताधिक्य राहिले.
२९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्तमाढा लोकसभा मतदारसंघातून एकूण ३१ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत संजय शिंदे व रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यात झाली. माढा विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे अॅड. विजयराव मोरे यांना केवळ ९ हजार ५५२ मतांवर समाधान मानावे लागले. इतर कोणत्याही उमेदवाराचा या निवडणुकीवर परिणाम झाला नाही. मोरे यांच्यासह सर्वच्या सर्व २९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.