उजनी धरणग्रस्तांच्या जमिनी १९७६ ला संपादित झाल्या आहेत. त्याचवेळी जमिनीचे संपादन झाले. सध्या उजनी धरणग्रस्तांच्या ज्या पूर्वी संपादन केलेल्या जमिनी आहेत, त्यावर सरकारी संपादन असे नाव असले तरी आज मूळ धरणग्रस्त शेतकरी स्वतःची जमीन कसत आहेत. त्यामुळे उजनी धरणाची उंची वाढवण्यासाठी कोणताही उजनी धरणग्रस्त बॅकवॉटरवरील शेतकरी आपली स्वतःची संपादित जमीन (फक्त सातबारा स्वतःच्या नावे नसलेली) तो कधीही संपादित करू देणार नाही. त्यासाठी उजनी धरणग्रस्त वेगळा लढा उभा करतील. त्यामुळे उजनी धरणाची उंची वाढवण्याचा जो कोणी प्रयत्न करेल किंवा प्रस्ताव आणेल, त्यास आमचा पूर्णपणे विरोध राहील, असे प्रा. पाटील यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन उजनी धरणातून ५ टीएमसी पाणी इंदापूरला देण्याच्या पालकमंत्र्यांच्या भूमिकेला विरोध करताना, त्यांनी ज्या शेतकऱ्यांचे उजनी धरण होतानाचे योगदान आहे, त्यांच्याच मुळावर आपली भूमिका मांडली. उजनी धरणामध्ये इतर ठिकाणांवरून पाणी आणण्याबद्दल ते बोलत नाहीत. उजनीतला गाळ काढून पाणी वाढवण्यावर पण ते बोलले नाहीत. पण, उजनी धरणाच्या गेटची उंची १ मीटरने वाढवली पाहिजे, असे म्हणत आहेत, हे चुकीचे असल्याचे रयत क्रांतीचे म्हणणे आहे.
त्यांचे समर्थन चुकीचे
अगोदरच शेतकरी धरणग्रस्त झाले आहेत. त्यांच्या जमिनींचे अधिग्रहण झाले आहे. १९९३ ला त्यावेळी बॅकवॉटरच्या सर्व शेतकऱ्यांनी विरोध केला होता. म्हणून, धरणाच्या गेटची उंची वाढवण्याचे काम थांबले होते.
आताही राजन पाटील धरणाच्या गेटची उंची वाढवण्याचे समर्थन करीत आहेत. ते चुकीचं सांगत आहेत.
शेतकरी हवालदिल
धरणाची उंची वाढवण्यामुळे माढा, करमाळा तालुक्यांतील शेती, रस्ते आणि पुन्हा काही गावे पाण्याखाली जातील. उजनी धरणासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी, घरेदारे व गावांचा त्याग करून धरण स्थापनेमध्ये योगदान आहे. सध्या उर्वरित जमिनीमध्ये कष्ट करून उदरनिर्वाह करतो आहे. धरणाची उंची वाढवण्याच्या वृत्ताने शेतकरी हवालदिल झाला आहे.
-----
पवारांना विरोध करण्याची हिम्मत नाही म्हणून पर्याय
जिल्ह्यातील नेत्यांना कृष्णा नदीतून, निरेतून पाणी आणायला नको, पाणी बाहेरून आणायला नको, हा धरणग्रस्तांवर अन्याय आहे. जिल्ह्यातील नेत्यांमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवारांना विरोध करण्याची हिम्मत नाही. म्हणून हा पर्याय सुचवून त्यांनी एक प्रकारे मूक संमतीच दिलेली आहे. याला उजनी बॅकवॉटर वरील सर्व धरणग्रस्थांचा विरोध असेल. वेळप्रसंगी रक्त सांडू पण उजनी धरणाच्या गेटची उंची वाढवू देणार नाही, अशी भूमिका रयत क्रांतीचे जिल्हा संपर्कप्रमुक प्रा. सुहास पाटील यांनी मांडली आहे.