राष्ट्रवादीचे आमदार संजय शिंदे यांनी निकालावर प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडीचा हा सामूहिक विजय असला तरी मतपत्रिकेवर ही निवडणूक झाली, हे महत्त्वाचे असल्याचे नमूद केले आहे. मतपत्रिकेमुळे राजकारणाची वस्तुस्थिती लक्षात आली असून, भाजपला लाखाचे मताधिक्य देणाऱ्या ‘ईव्हीएम’ मशीन आता संशोधनाचा विषय झाल्याचे म्हटले आहे. या निवडणुकीतून ‘ईव्हीएम’ मशीनचा खरा प्रकार समोर आला असून, भविष्यात सर्व निवडणुका मतपत्रिकेवरच व्हायला हव्यात, अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे आमदार शिंदे यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती.
माजी आमदार दीपक साळुंखे यांनीही पदवीधर व शिक्षक मतदारसंघात मतपत्रिकेवर मतदान झाल्याने आम्ही निर्धास्त होतो, असे म्हटले आहे. बटनावर आमचा विश्वास नाही. राज्यात पाच उमेदवार महाविकास आघाडीचे निवडून आले. विरोधात असलेली मंडळी एकाच व्यासपीठावर आणल्याने हे यश आल्याचे त्यांनी नमूद केले.
हे तर मिरॅकल : देशमुख
ईव्हीएम मशीनवर निवडून आलेले आमदारच संशय घेत असतील तर हे मिरॅकल म्हणावे लागेल, अशी प्रतिक्रिया भाजपचे शहर अध्यक्ष विक्रम देशमुख यांनी दिली. सोलापूर व पुणे जिल्ह्याने भाजपला साथ दिली. कोल्हापूर, सांगली व सातारा पट्ट्यात महाविकास आघाडीच्या पारड्यात जादा मते गेल्याचे दिसत आहे. त्यांची एकजूट व बऱ्याच शिक्षण संस्था राष्ट्रवादी व काँग्रेस नेत्यांच्या असल्याने हा फरक झाला असावा. आम्ही कुठे कमी पडलो याचे आत्मचिंतन करू, असेही ते म्हणाले.