विठ्ठल खेळगी, सोलापूर : बुधवारी सकाळपासूनच अकलूज येथील मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. भाजपचे प्रशांत परिचारक यांनी मोहिते-पाटलांची भेट घेऊन बाहेर पडताच शरद पवार गटाचे अमोल कोल्हे हेही मोहिते-पाटलांच्या भेटीला दाखल झाले होते. मोहिते-पाटलांनी तुतारी हातात घेतल्याचे जाहीर केल्यामुळे माढा लोकसभा निवडणुकीत आता नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
माढा लोकसभेतून भाजपकडून रणजीतसिंह निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून मोहिते-पाटील व रामराजे समर्थकांमधून विरोध सुरू होता. काही दिवसांनी विरोध कमी होईल, असे पक्षश्रेष्ठीकडून सांगण्यात येत होते. मात्र हा विरोध कायमच राहिला. अखेर बुधवारी जयसिंह मोहिते-पाटील यांनी तुतारीच्या चिन्हावरच निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. तत्पूर्वी मोहिते पाटलाची चर्चा करण्यासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक शिवरत्न बंगल्यावर दाखल झाले होते. त्यानंतर थोड्याच वेळात शरद पवार गटाचे अमोल कोल्हे हेही शिवरत्नवर पोहोचले.
यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी अमोल कोल्हे म्हणाले, मोहिते पाटलांनी तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवावी असे त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे. मात्र पाहूया पुढे काय काय होतं असे म्हणत वेट अँड वॉचची भूमिका कोल्हे यांनी मांडली. राज्यातही महाविकास आघाडीच्या जास्त जागा येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.