राजा माने
सोलापूर - आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीकडून जवळपास आघाडी करण्याचं निश्चित झालं आहे. त्यानुसार जागावाटपाचा फॉर्म्युलाही ठरल्याचे समजते. मात्र, भाजपा व शिवसेनेच्या आजही स्वतंत्र चुली आहेत. त्यामुळे लोकसभेला काय होणार, असा प्रश्न महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारला होता. त्यावर बोलताना, पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवारसाहेब हे एकच कार्यकर्ता असून बाकी सर्वच नेते, असे म्हणत पाटील यांनी राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीवर अप्रत्यक्षपणे नेम धरला.
ज्यांना भीती असते, ते अडजेस्टमेंट करत लगेचच तयारी दर्शवतात. तशीच काँग्रेस अन् राष्ट्रवादीला भीती आहे. एका सर्वेक्षणानुसार, काँग्रेस अन् राष्ट्रवादी स्वतंत्र लढल्यास राष्ट्रवादी 41 जागांवरुन केवळ 10 जागांवर येऊन ठेपेल. काँग्रेसची मूळं आजही मजबूत आहेत, पण राष्ट्रवादीचा मोठा पराभव होऊ शकतो. पवारसाहेब हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याबद्दल मला अभिमान आहे. मी नेहमी म्हणतो, राष्ट्रवादीमध्ये एकच कार्यकर्ता आहे तो म्हणजे शरद पवार अन् बाकीचे सर्व नेते. त्यामुळे पवारसाहेब राजकारण अत्यंत हुशार असून त्यांना दोन्ही पक्षांची एकत्र मोट बांधायची गरज असल्याचे ज्ञात आहे, असे पाटील यांनी सांगितले. मात्र, भाजप-शिवसेनेमध्ये तसं नाही. येथे, 'आम्ही काय कुणाचे खातो, तो राम आम्हाला देतो', अशी पक्षांची भूमिका असते. नाही आलं सरकार तरी चालेल, आलं काँग्रेसचं सरकार तरी चालेल, असा सूर इथल्या नेत्यांचा असतो. त्यामुळे आमच्या युतीचं लांबत जात आहे. जेव्हा केव्हा आमच्यातला हा अहंकार बाजुला जाईल, तेव्हा.... कारण, युती न झाल्यास आमचं काही बिघडत नाही, पण समाजाचं नुकसान होतं. आपल्या समाजाचा 5 वर्षापूर्वीचा इतिहास आहे, त्यानुसार जर आम्ही थांबावं अशी स्टेज आली असेल तर इट्स ओके.... अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी आगामी युतीबाबत स्पष्टीकरण दिले आहे.