पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक लागली असून, भाजपकडून उद्योजक समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली गेली आहे. मात्र, राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके की दिवंगत आ. भारत भालके यांच्या पत्नी जयश्रीताई भालके यांना उमेदवारी मिळते याकडे लक्ष लागले होते. सोमवारी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृतपणे भगीरथ भालके यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
गेल्या चार दिवसांपासून भगीरथ भालके यांनी आपणच उमेदवार आहोत, असे सांगत प्रचार सुरू केला आहे. आता पक्षाने तसे घोषित केल्याने उमेदवारीसंबंधीचा सस्पेन्स संपला आहे. त्यामुळे आता भाजपकडून समाधान आवताडे आणि महाविकास आघाडीकडून भगीरथ भालके यांच्यात थेट सामना रंगणार आहे.
मंगळवारी दोघांकडून मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. या पोटनिवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
---
राष्ट्रवादी, भाजप दोघांनीही कंबर कसली
राष्ट्रवादीचे आ. भारत भालके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे. त्या जागेवर १७ एप्रिल रोजी निवडणूक होत असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवार शेवटचा दिवस आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीने ही आपली हक्काची जागा राखण्यासाठी कै. आ. भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर करून सहानुभूतीच्या लाटेवर ही जागा सहज जिंकू, असा विश्वास व्यक्त केला आहे. तर भाजपकडून परिचारक - आवताडे यांच्यात मनोमिलन घडवत मतविभागणी टाळण्यासाठी एकास एक उमेदवारी म्हणून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवाय ही निवडणूक प्रतिष्ठेची करीत जागा खेचून आणण्यासाठी बड्या नेत्यांवर जबाबदारी दिली आहे. त्यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे.
---