साेलापूर : शहर राष्ट्रवादी काँग्रेसमधील दाेन लाेक शरद पवार यांच्यासाेबत झालेल्या बैठकीची माहिती सुशीलकुमार शिंदे यांना कळवितात. त्यामुळे पक्षाचे नुकसान हाेत आहे, असा खळबळजनक आराेप माजी शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमाेर मंगळवारी पुण्यात केला. यावर अजित पवार या दाेन खबऱ्यांवर चांगलेच भडकले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात जिल्ह्यातील माेजक्या नेत्यांशी संवाद साधला. साेलापूर विधान परिषद, महापालिका व झेडपी निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाची काय भूमिका हवी, यावर विचारविनिमय केला. शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संताेष पवार, महेश काेठे, मनाेहर सपाटे, दिलीप काेल्हे, जनार्दन कारमपुरी, किसन जाधव, महेश गादेकर, विद्या लाेलगे यांच्याकडून शहरातील कामांचा आढावा घेतला. शहराच्या विविध भागात पक्षाने नवे लाेक जाेडल्याचे पवार यांनी सांगितले. काेल्हे व कारमपुरी यांनी शहराध्यक्ष महत्त्वाच्या बैठकांना बाेलावत नसल्याची तक्रार केली. प्रदेशाध्यक्षांनी सुकाणू समितीची स्थापना केली. या समितीची बैठक हाेत नसल्याचे सांगितले. शहराध्यक्ष व कार्याध्यक्षांनी नवे लाेक जाेडले आहेत. पण हे बिनकामाचे आहेत अशी तक्रारही केली. सुकाणू समितीमध्ये माेजके लाेक घेण्यात यावेत, असे अजितदादांनी सांगितले.
पवारांना दाखविले ‘विजय-प्रताप’मधील व्हिडिओ
ज्येष्ठ नेत्यांनी केलेल्या तक्रारींना संताेष पवार यांनी उत्तर दिले. आम्ही सर्वांना साेबत घेऊन जायचा प्रयत्न करताे. शहराध्यक्षही सर्वांना फाेन करतात. पण पक्षातील काही लाेक जुने येत नाहीत. उलट हे लाेक विजय-प्रताप युवा मंचच्या कार्यालयात बसून पक्षविराेधी कारस्थान करतात. आंदाेलन, कार्यक्रमाला जाऊ नकाे म्हणून नव्या कार्यकर्त्यांना दमबाजी करतात. तरुण मुलांना शिवीगाळ करतात. हे पाहा व्हिडिओ म्हणत कार्याध्यक्ष संताेष पवार यांनी शरद पवार यांना व्हिडिओ दाखविले. हे व्हिडिओ पाहून बैठकीत शांतता पसरली.
काय म्हणाले गादेकर...
संताेष पवार यांच्याप्रमाणे महेश गादेकर यांनीही काही ज्येष्ठ मंडळींबद्दल तक्रार केल्याचे सांगण्यात आले. गादेकर म्हणाले, आपल्या पक्षातील काही लाेक गद्दारी करतात. आता या बैठकीला उपस्थित असलेले दाेन लोक उद्या सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे जातील. आपल्या बैठकीत काय ठरले याची माहिती देतील. हे ऐकताच अजित पवार संतापले. म्हणजे यांना आपला पक्षच चालवायचा नाही. हे यापुढील काळात खपवून घेतले जाणार नाही, असे पवारांनी सुनावले.
महापालिकेची सूत्रे महेश काेठे यांच्याकडे
शहराच्या बैठकीत शरद पवार यांनी महापालिकेच्या निवडणुकीची सर्व सूत्रे महेश काेठे यांच्याकडे राहतील, असे संकेत दिले. शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांना सहकार्य करावे, असे पवारांनी सांगितले. जाधव व पवार यांनी तत्काळ तयारी दाखविली; मात्र या बैठकीला उपस्थित असलेले इतर ज्येष्ठ नेते मात्र भलतेच नाराज झाले.
प्रलंबित पक्षप्रवेश लवकर व्हावेत
अजित पवारांनी बैठका घ्याव्यात
ग्रामीण विभागाच्या बैठकीला पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय शिंदे, आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, माजी आमदार दीपक साळुंखे, कल्याणराव काळे, भगिरथ भालके, निरंजन भूमकर, लतीफ तांबाेळी आणि जिल्हा निरीक्षक सुरेश पालवे उपस्थित हाेते. काेराेना कमी झाल्यामुळे आता पक्ष संघटन वाढीवर जाेर द्या, असे पवारांनी सांगितले. जिल्ह्यातील पक्षाची घडी विस्कळीत आहेे. ती सावरण्यासाठी अजित पवार यांनी महिन्यातून एकदा बार्शी, पंढरपूर व साेलापूरमध्ये येऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधावा. काही लाेक पक्षात येण्यास तयार आहेत. त्यांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम करावा, अशी मागणी राजन पाटील यांनी केली.
प्रशासनावर वचक नाही, एक समन्वयक नेमा
ग्रामीणच्या नेत्यांनी पालकमंत्र्यांबद्दल अवाक्षर काढले नाही; मात्र प्रशासकीय अधिकारी आमचे ऐकत नाहीत. प्रशासनावर आपला वचक नाही. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची कामे, पक्ष संघटन यासाठी एक समन्वयक नेमण्यात यावा. अजित पवारांनी विशेष घालावे, अशी मागणी केली. झेडपीमध्ये निधी वाटपात अनियमितता आहे. मनमानी सुरू आहे. यावरही नियंत्रण हवे, असेही काही नेत्यांनी सांगितले.