पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी विविध पक्ष, सामाजिक संघटना तयारीला लागल्या असताना राष्ट्रवादीमध्ये गेल्या महिनाभरापासून विठ्ठल साखर कारखाना व पक्ष संघटनेतील निवडीवरून घमासान सुरू आहे. मावळते अध्यक्ष दीपक पवार यांना हटविल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्र बैठक घेऊन दीपक पवार यांना न्याय न दिल्यास सामूहिक राजीनामे देण्याची घोषणा केली. त्यानंतर पक्षाने परिस्थिती जाणून घेण्यासाठी पक्ष निरीक्षक म्हणून संजय पाटील यांना पंढरपुरात पाठविले. मात्र, संजय पाटील यांच्या नियुक्तीलाच जिल्हा निरीक्षक सुरेश घुले यांनी स्थगिती दिली व नवीन अध्यक्ष विजयसिंह देशमुख यांना लेखी पत्रक काढत नवीन आदेश येईपर्यंत संघटनात्मक निवडी न करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानंतरही रविवारी विद्यमान अध्यक्ष विजयसिंह देशमुख यांनी दिवंगत आ. भारत भालके यांच्या बंगल्यावर तालुक्यातील इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करत त्यांना लेखी पत्रेही दिली. यावेळी विठ्ठलचे अध्यक्ष भगिरथ भालके यांच्यासह भालके समर्थक उपस्थित होते. त्यामुळे नवीन अध्यक्ष पक्षाच्या निरीक्षक व जिल्हाध्यक्षांचा आदेश मानत नाहीत का? याविषयी आता चर्चा रंगू लागल्या आहेत.
जिल्हाध्यक्ष आल्यामार्गे परतले
पंढरपूर तालुका राष्ट्रवादीच्या रविवारी निवडी केल्या जाणार आहेत. याबाबतची कुणकुण लागताच जिल्हाध्यक्षांना तसा निरोप देऊन त्या निवडी थांबविण्यासाठी प्रयत्न केला. त्यानंतर जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी दूरध्वनीवरून विजयसिंह देशमुख, भगिरथ भालके यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. काही कालावधीनंतर संपर्कही झाला व निवडी करू नका. यामुळे पक्षाची नाचक्की होत आहे. वरिष्ठांच्या आदेशाची अंमलबजावणी करा, अशा सूचना केल्या. मात्र, स्थानिक पदाधिकारी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यानंतर स्वत: बळीराम काका साठे यांनी पंढरपूर गाठले. समक्ष भेटून पुन्हा त्या पत्राची आठवण करून दिली. पक्ष निरीक्षकांशी बोलणेही करून दिले. मात्र, सर्व ऐकून घेऊनही तालुकाध्यक्ष विजयसिंह देशमुख यांनी निवडी जाहीर केल्यामुळे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे आल्यामार्गे परत गेले.
कोट ::::::::::::::::::::::::
मी पक्षाच्या बैठकीबाबत दोन दिवस मुंबईत आहे. जिल्हाध्यक्ष काका साठेंना काही मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. त्या त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सांगून त्याचे पालन करून पंढरपुरात पक्ष संघटन जास्तीत जास्त कसे बळकट होईल, याविषयी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, तरीही काही चुकीचा प्रकार घडला असल्यास आपण स्वत: पंढरपूरला जाऊन याबाबत माहिती घेऊ व पुढील निर्णय जाहीर करू.
- सुरेश घुले
सोलापूर जिल्हा पक्ष निरीक्षक, राष्ट्रवादी
कोट ::::::::::::::::::::
मी स्वत: पंढरपूरला जाऊन निवडी जाहीर करू नका, हे चुकीचे आहे, असे सांगण्याचा प्रयत्न केला. तरीही त्यांनी निवडी जाहीर केल्या. पक्षाचा आदेश पाळला नाही म्हणून त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. मी तसा अहवाल पक्ष निरीक्षक, प्रदेशाध्यक्षांना देणार आहे. ते योग्य निर्णय घेतील.
- बळीराम साठे
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी
कोट :::::::::::::::::::::::::
आम्हाला जिल्हाध्यक्षांनी निवडी स्थगित ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, रविवारी पोटनिवडणुकीसंदर्भात निवडक कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. त्याठिकाणी काका साठेही उपस्थित होते. त्यांच्या विनंतीवरूनच आम्ही पूर्ण तालुक्याच्या निवडी जाहीर न करता पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या फक्त २२ गावांच्या निवडी जाहीर केल्या आहेत. त्यामुळे पक्षाचा आदेश डावलण्याचा प्रश्नच नाही.
- विजयसिंह देशमुख
तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी