मंगळवेढा : मंगळवेढा तालुका व शहर राष्ट्रवादी निवडीवरून सुरू झालेले वादंग थेट हायकमांड शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापर्यंत पोहचले आहे. नव्या निवडीला स्थगिती दिल्याचे पत्र जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी जुन्या पदाधिकाऱ्यांना दिले यावर काही क्षणात साठे यांनी मंगळवेढा तालुका व शहरातील संघटनात्मक बदलासंदर्भात अंतिम निर्णय होईपर्यंत जुनी व नवी मंगळवेढा तालुका व शहर राष्ट्रवादी कार्यकारणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्याचे दुसरे पत्र काढले आहे. कार्यकारिणी बरखास्त केल्याने निवडीवरून सुरू झालेल्या वादावर पडदा पडला आहे.
राष्ट्रवादीचे पदाधिकारी, नेते यांच्या लेखी निवेदन पत्रानुसार व येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, संघटनात्मक फेरबदल करण्याचा निर्णय दि. १ ऑक्टोबर रोजी घेण्यात आला होता. त्यानंतर मंगळवेढा तालुक्यातील जुन्या कार्यकारिणीतील पदाधिकारी व नेते, राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना वरील संदर्भाने भेटण्यासाठी गेले होते. पवार यांनी त्यांची बाजू ऐकून घेऊन सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना चौकशी केली होती. त्याच बरोबर नवनियुक्त पदाधिकारी व तालुका व शहरातील इतर पदाधिकारी देखील खा. पवार भेटण्यासाठी गेले होते. या पदाधिकाऱ्यांनी व नेत्यांनी देखील आपली भूमिका वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये मांडली. जुन्या व नव्या पदाधिकाऱ्यांची व नेत्यांची बाजू ऐकून खा पवार यांनी मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी कार्यकारणी संदर्भात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाध्यक्ष, कार्यकारी जिल्हाध्यक्ष, तसेच जुन्या व नव्या कार्यकारिणीतील प्रमुख दोन ते तीन पदाधिकारी व दोन्ही बाजूचे एक दोन प्रमुख नेते यांची संयुक्त बैठक घेऊन मंगळवेढा तालुका कार्यकरीणी संदर्भात निर्णय घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
त्याप्रमाणे प्रदेशाध्यक्ष ,पालकमंत्री यांची वेळ घेऊन अंतिम निर्णय घेण्याचे ठरले आहे. त्यामुळे मंगळवेढा तालुका व शहरातील संघटनात्मक बदलासंदर्भात अंतिम निर्णय होईपर्यंत, मंगळवेढा तालुका व शहर राष्ट्रवादी कार्यकारणी (जुनी व नवी) बरखास्त करण्याचा निर्णय घेत असल्याचे पत्राद्वारे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी जाहीर केले आहे. या आठवड्यात मंगळवेढा येथे राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके, राहुल शहा यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. असे सांगण्यात आले. एकाच दिवशी जिल्हाध्यक्षाच्या दोन पत्रांनी मंगळवेढ्यात राष्ट्रवादी अंतर्गत सुरू आलेले शह-काटशहचे राजकारण पाहायला मिळाले.