आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक लागल्यानंतर त्यांच्याच कुटुंबात त्यांची पत्नी किंवा मुलगा विठ्ठलचे अध्यक्ष भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीकडून संधी मिळावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उमेदवारीबाबत योग्यवेळी निर्णय घेतला जाईल, असे सांगत उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे. शिवाय राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांनीही पंढरपुरात आल्यानंतर भाजपचे आजी-माजी आमदार राष्ट्रवादीच्या प्रवेशासाठी संपर्कात असल्याचे सांगत खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे पोटनिवडणुकीत उमेदवारी नक्की भालके कुटुंबीयांना मिळणार का? याबाबत कोणीही ठामपणे सांगत नसले तरी त्यांच्या परिवारातच उमेदवारी मिळावी, याबाबत कार्यकर्त्यांचा दबाव पक्षावर नक्कीच आहे. आपल्यालाच उमेदवारी मिळेल, असे गृहित धरून भगीरथ भालके यांनी जनसंवाद यात्रेद्वारे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात गावभेट दौरा सुरू करीत निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर गेल्या दोन महिन्यांपासून महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी पुन्हा शिवसेना सदस्यत्व नोंदणी अभियान राबवित घरोघरी जाऊन नागरिकांचा संपर्क वाढविला आहे. यादरम्यान त्यांनी शिवसेनेचे सोलापूर सहसंपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांच्या उपस्थितीत पंढरपूर शहरात पक्षाचे कार्यालयही उघडले आहे. शिवाय विविध आंदोलनात सहभाग नोंदवत शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करीत येणाऱ्या पोटनिवडणुकीत आपण स्वत: उतरणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्तेही पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले आहेत. मागीलवेळीही पूर्ण तयारीनिशी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या शिवसेनेला महाआघाडीतही जागा मिळणार का? याबाबत उत्सुकता आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत भालके, परिचारक, आवताडे यांच्यामध्ये काट्याची टक्कर झाली होती. या निवडणुकीत मात्र भालके परिवारातील उमेदवार पुन्हा तयारीला लागला असताना भाजपाकडून मात्र आवताडे की परिचारक याबाबत स्पष्टता नाही. दोघांकडूनही सावध भूमिका घेत पोटनिवडणुकीविषयी चाचपणी केली जात आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मंगळवेढ्यात आवताडे तर पंढरपुरात परिचारक गटाचे प्राबल्य असल्याचे सिद्ध झाले आहे. शिवाय परिचारकांच्या घरात एक आमदारकी असताना दुसऱ्यावेळी भाजपाकडून त्यांना उमेदवारी मिळणार की दामाजीचे अध्यक्ष समाधान आवताडे यांना पुढे केले जाणार, याबाबत दररोज नव्या चर्चा मतदारसंघात रंगत आहेत.
आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर कल्याणराव काळे यांना विठ्ठल परिवाराची जबाबदारी सांभाळण्याचे संकेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले होते. त्यामुळे काळे पुन्हा राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर दिसू लागले आहेत. तेही यामध्ये काही संधी मिळते का? याची चाचपणी करीत आहेत. तर डिव्हीपी उद्योग समूहाचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी गेल्या चार महिन्यांपासून विठ्ठल कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेल्या गावागावात जाऊन कार्यकर्त्यांचे नवीन जाळे तयार केले आहे. शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटीही त्यांनी वाढविल्या आहेत. त्यामुळे त्यांनीही यामध्ये उतरण्याचे संकेत दिले आहेत.
फोटो :::::::::::::::
भगीरथ भालके, प्रशांत परिचारक, समाधान आवताडे, शैला गोडसे, कल्याणराव काळे, अभिजीत पाटील