चार महिन्यात सोलापूरला राष्ट्रवादीचा तिसरा पालकमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 01:56 PM2020-04-22T13:56:12+5:302020-04-22T14:16:54+5:30
सोलापूरच्या पालकमंत्री पदी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती: गुरूवारी घेणार 'कोरोना'चा आढावा
सोलापूर : चार महिन्यात सोलापूरला राष्ट्रवादी काँग्रेसचा तिसरा पालकमंत्री मिळाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूरचे आमदार तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची सोलापूरच्या पालकमंत्री बुधवारी नियुक्ती केली आहे.
राज्यात महाआघाडीचे सरकार सत्तेवर आल्यावर सोलापूरचे पालकमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय कामगार मंत्री दिलीप वळसे—पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. दोन महिने त्यांचा कार्यकाल चालल्यानंतर कोरोनाची साथ सुरू झाली. या साथीच्या उपाययोजनेबाबत वळसे—पाटील यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारेच प्रशासनाकडून दोनदा आढावा घेऊन सूचना दिल्या. प्रकृती अस्वास्थामुळे सोलापुरात येऊन कामकाज करणे अशक्य असल्याने त्यांनी कळविल्यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची सोलापूरचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यावर आव्हाड यांनी तातडीने सोलापुरात येऊन जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना साथीच्या प्रतिबंधासाठी केलेल्या उपाययोजनेचा आढावा घेतला. त्यानंतर मुंबईला परतल्यानंतर आव्हाड यांनी स्वत:ला होम कोरंनटाईन करून घेतल्याचे सांगण्यात आले. अशात मंगळवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
इकडे सोलापुरात कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. साथीवर नियंत्रण आणण्यासाठी करावयाच्या उपाययोजनेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी पालकमंत्र्यांची गरज भासू लागल्याची मागणी वाढल्यावर तिसरा नवीन पालकमंत्री नियुक्त करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी घेतला. त्यानंतर बुधवारी राज्याचे सचिव अंशू सिन्हा यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सोलापूरचे पालकमंत्री म्हणून नियुक्तीचा आदेश जारी केला आहे.
तातडीने बैठक घेणार
महाआघाडी सरकारच्या कारकीर्दीत सोलापूरचे तिसरे पालकमंत्री म्हणून पदभार घेणारे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे गुरूवारी तातडीने सोलापुरात दाखल होणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना साथीच्या प्रतिबंधासाठी करण्यात येणाºया उपाययोजनांचा आढावा घेणार असल्याचे सांगण्यात आले.